Swapnil Joshi : “तुम्हीच कृष्ण आहात… रोज एक तरी माणूस माझे पाय धरून असं बोलतो”; स्वप्नील जोशीचं मोठं वक्तव्य

Swapnil Joshi : मराठी इंडस्ट्रीमध्ये चॅाकलेट बॅाय म्हणून ओळख असलेला अभिनेता ‘स्वप्नील जोशी’ने त्याच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तरुण वर्गात तो अधिक लोकप्रिय आहे. अनेक चित्रपट आणि मालिकांद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो.
काही दिवसांपूर्वीच स्वप्नीलची प्रमुख भूमिका असलेले ‘जिलबी’ आणि ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले आहेत. आता अभिनेता ‘सुशीला – सुजीत’ एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटातील नवीन गाणे रिलीज झाले आहे.
या सिनेमात स्वप्नील सोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीदेखील मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच सुनिल तावडे, रेणुका दफ्तरदार, प्रसाद ओक, सुनिल गोडबोले यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकतंच सिनेमाच्या संपूर्ण टीमने एका प्रसिद्ध वृत्तवाहीला मुलाखत दिली आहे. यावेळी स्वप्नीलने अनेक किस्से आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी स्वप्नील जोशीला “तुमचा कृष्ण आवडतो असा कोणी प्रेक्षक भेटलाय का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, “मला रोज कोणीतरी भेटतच, रोज एक तरी माणूस माझे पाय धरून म्हणतो की कृष्ण तुम्हीच आहात.
मला असं वाटतं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे राहणार आहे. मला सार्थ अभिमान आहे की ते आहे. तो माझ्या असण्याचा अस्तित्त्वाचा एक भाग आहे. ३०-४० वर्षांपूर्वी केलेलं काम काल केल्यासारखं आठवतंय तर तो आशीर्वाद आहे, असं मला वाटतं”. असं अभिनेता यावेळी म्हणाला.
स्वप्नीलने बालकलाकार म्हणूनच काम करायला सुरुवात केली होती. प्रख्यात दिग्दर्शन रामानंद सागर यांच्या पौराणिक मालिकांनी ९०च्या दशकातील छोटा पडदा चांगलाच गाजवला होता. या मालिकांपैकी एक म्हणजे ‘श्री कृष्ण’ मालिका.
या मालिकेतील कलाकारांना जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती. या कलाकारांना त्यांच्या खऱ्या आयुष्यातही त्या पात्रांद्वारेच ओळखलं जाऊ लागलं होतं. या मालिकेत ‘स्वप्नील जोशी’ने भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. आणि आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यानंतर अभिनेते ‘सर्वदमन बनर्जी’ हे कृष्णाची भूमिका पुढे घेऊन गेले.





