INDIA Aghadi : राहुल गांधींची ताकद वाढली; माजी मंत्री थेट पक्षासह इंडिया आघाडीत सामील
INDIA Aghadi : उत्तर प्रदेशचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राहुल गांधींची भेट घेत अपनी जनता पार्टी INDIA आघाडीत सहभागी होणार असल्याची घोषणा केली.

INDIA Aghadi : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अपनी जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मौर्य यांनी आपला पक्ष INDIA आघाडीत सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.
राहुल गांधी यांच्या भेटीसाठी मौर्य १० जनपथ येथे पोहोचले होते. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, “अपनी जनता पार्टी आता INDIA आघाडीचा भाग असेल. पुढील रणनीती तसेच किती जागा लढवायच्या, याबाबत नंतर चर्चा केली जाईल,” असे सांगितले.
‘भाजप हटवणे हेच लक्ष्य’
आपली भूमिका स्पष्ट करताना मौर्य यांनी ‘भाजप हटाओ, देश बचाओ’ आणि ‘संविधान बचाओ, भाजप हटाओ’ अशी घोषणा केली. राहुल गांधी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असल्याचा दावा त्यांनी केला. उत्तर प्रदेशात आपला पक्षही याच मुद्द्यांवर काम करत असल्याचे मौर्य म्हणाले. या समान भूमिकेमुळे INDIA आघाडीसोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
कोण आहेत स्वामी प्रसाद मौर्य?
स्वामी प्रसाद मौर्य यांचा जन्म २ जानेवारी १९५४ रोजी प्रतापगड येथे झाला. ते OBC समाजातून येतात. त्यांनी इलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण घेतले असून एलएलबी आणि एम.ए. पदवी मिळवली आहे. त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य या भाजपच्या खासदार राहिल्या आहेत.
मौर्य यांनी १९८० मध्ये राजकारणात प्रवेश केला. ते डलमऊ आणि पडरौना मतदारसंघातून पाच वेळा आमदार राहिले आहेत. उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री तसेच विधानसभेत विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेते म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांनी बहुजन समाज पक्ष आणि भाजपमध्येही काम केले आहे.





