Congress : वारं फिरलं! काॅंग्रेसमध्ये इनकमिंग सुरू; थेट राष्ट्रीय प्रवक्त्यांचा प्रवेश सोहळा
Congress : AAPच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी आप सोडण्याचे कारण सांगत राहुल गांधींचे कौतुक केले.

Congress : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. ‘आप’च्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी शनिवारी (३ ऑक्टोबर) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी सदस्य श्याम सुंदर शर्मा आणि पत्रकार रजत टंडन यांनीही काँग्रेसची सदस्यता घेतली.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला, महासचिव सैयद नासिर हुसैन, मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेरा आणि दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी राजीव शुक्ला यांनी श्याम सुंदर शर्मा हे उत्तर प्रदेशातील प्रभावशाली नेते असून ते आठ वेळा आमदार आणि माजी मंत्री राहिल्याचे सांगितले.
प्रियंका कक्कड यांनी आप का सोडला?
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रियंका कक्कड यांनी दिल्लीबाबतची आपली भूमिका मांडली. आपण ज्या दिल्लीत लहानाच्या मोठ्या झालो, ती स्वच्छ, हिरवीगार, सुरक्षित आणि प्रगत दिल्ली पुन्हा पाहायची आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय राजकारणातील दशकभराहून अधिक अनुभवाच्या आधारावर काँग्रेस हे काम करू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कक्कड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही कौतुक केले. राहुल गांधी हे प्रामाणिक आणि ठाम विचारांचे नेते असल्याचे त्यांनी म्हटले.
केजरीवालांच्या भूमिकेवर प्रश्न –
‘आप’ सोडण्यामागे पक्षाच्या पूर्वीच्या भूमिकांपासून झालेला बदल हे एक कारण असल्याचे कक्कड यांनी सांगितले. ‘आप’ने बंगला आणि सरकारी गाडीचा वापर करणार नसल्याचे जनतेला सांगितले होते. मात्र, नंतर खासगी प्रवासासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी हे ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर लढा देत असल्याचे सांगताना कक्कड यांनी निवडणूक प्रक्रियेबाबतही भाष्य केले. त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाचे समर्थन करत काँग्रेसमध्ये आपले स्वागत केल्याबद्दल पक्षातील नेत्यांचे आभार मानले.
काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रियंका कक्कड यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.





