Punjab Congress : पंजाब प्रदेशाध्यक्षपदी भारतीय हॉकी संघाच्या माजी कर्णधाराची निवड, विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचा मोठा निर्णय
Punjab Congress : पंजाब काँग्रेसने आमदार परगट सिंह यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. जाणून घ्या त्यांचा हॉकीतील प्रवास, राजकीय कारकीर्द आणि नव्या जबाबदारीसमोरील आव्हाने.

Punjab Congress : काँग्रेसने पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार परगट सिंह यांची नियुक्ती केली आहे. 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करण्याची मोठी जबाबदारी आली आहे. यापूर्वी अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेशाध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे.
परगट सिंह हे भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार असून पंजाबमध्ये शिक्षण आणि क्रीडा मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते जालंधर कॅन्ट मतदारसंघाचे आमदार आहेत. पंजाबच्या राजकारणात प्रभावी मानल्या जाणाऱ्या जट शीख समाजातून ते येतात.
गटबाजी संपवण्याचे आव्हान –
पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून अंतर्गत मतभेद असल्याचे चित्र आहे. वडिंग आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या गटांमध्ये मतभेद असल्याची चर्चा होती. त्यामुळे परगट सिंह यांच्यासमोर पक्षातील विविध नेत्यांना एकत्र घेऊन संघटना मजबूत करण्याचे आव्हान असेल.
प्रदेशाध्यक्षपदासाठी विजय इंदर सिंगला, राणा के.पी. सिंह, सुखबिंदर सिंह सरकारिया, चरणजीत सिंह चन्नी आणि सुखजिंदर सिंह रंधावा यांचीही नावे चर्चेत होती.
Hon’ble Congress President Shri @kharge has appointed Shri Pargat Singh as the President of the Punjab Pradesh Congress Committee, with immediate effect. https://t.co/j3Jp7b3zEm
— Congress (@INCIndia) October 2, 2026
सलग तीन वेळा आमदार –
61 वर्षीय परगट सिंह यांनी 2012, 2017 आणि 2022 मध्ये जालंधर कॅन्ट विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले. 1992 बार्सिलोना आणि 1996 अटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले. 1988 सोल ऑलिम्पिक तसेच अनेक विश्वचषक स्पर्धांमध्येही ते भारतीय संघात होते.
जालंधरच्या मीठापूर गावात जन्मलेल्या परगट सिंह यांनी पंजाबचे क्रीडा संचालक म्हणूनही काम केले. त्यांच्या कार्यकाळात गावांमध्ये हॉकीची मैदाने उभारण्यावर आणि खेळाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला. 1989 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार, तर 1998 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. 1998 मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती.
परगट सिंह यांनी पंजाब काँग्रेसचे महासचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर अमरिंदर सिंह राजा वडिंग आणि सुखजिंदर सिंह रंधावा यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. आता परगट सिंह यांच्या नेतृत्वाखाली पंजाब काँग्रेस अंतर्गत मतभेद दूर करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघटना कशी उभी करते, याकडे लक्ष लागले आहे.




