स्वाभिमानीचा स्वबळाचा नारा.! एनडीए अन् इंडियासोबत युती करणार नाही- राजू शेट्टी

नाशिक – देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीए आणि विरोधकांची इंडिया अशा दोन आघाड्यांत राजकीय पक्षांची विभागणी होताना दिसते आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपण दोन्हींकडे जाणार नसल्याचे स्पष्ट करत स्वबळाचा नारा दिला आहे.
राजू शेट्टी यांनी 2019 मध्ये आम्ही राजकीय आघाडीत जाण्याचा निर्णय ऊसाच्या एफआरपीसाठी घेतला होता. मात्र त्यावेळी निर्णय घेताना आम्हाला कोणीही विश्वासात घेतले नव्हते, असे नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या माजी खासदार शेट्टी यांनी पुढे बोलताना म्हटले.
शेट्टी पुढे म्हणाले की, भूमीलेखाचा कायदा करतांना तसेच जमिनी अधिग्रहित करतांना मविआने त्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांवर अन्याय केला. राजकीय नेते सत्ता नसतांना शेतकऱ्यांच्या बाजून असतात, पण सत्तेत गेल्यावर शेतकऱ्यांच्या विरोधात जातात.
राज्यातील सध्याचे चित्र तर अत्यंत गंभीर व चिंताजनक झाले आहे. कोण कधी फुटेल माहिती नाही, अजून देखील वेळ आहे. मतदार या सगळ्यांना सोडून नवीन आश्वासक चेहरा निवडून देतील असे मला वाटते, असेही त्यांनी यावेळी म्हटले.





