जम्मू : पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी यांनी काश्मीरविषयी प्रतिकूल टिप्पणी केली. त्यावरून राजकीय वादंगाला तोंड फुटले. एवढेच नव्हे तर, अधिकारी यांनी मांडलेली भूमिका स्वपक्षाचीच राजकीय कोंडी करणारी ठरली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील पर्यटनावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे पर्यटनाला पुन्हा चालना देण्याच्या उद्देशातून जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी नुकतीच बंगालला भेट दिली. त्यावेळी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काश्मीर भेटीचे निमंत्रण दिले. त्याचा संदर्भ घेऊन बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते असणाऱ्या अधिकारी यांनी एक वक्तव्य केले. सुरक्षेच्या कारणास्तव बंगाली जनतेने काश्मीरला किंवा मुस्लिमबहुल भागांना भेट देणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिकारी यांचे वक्तव्य स्वपक्षाच्याच भूमिकेला छेद देणारे ठरले. काश्मीरमधील सुरक्षाविषयक स्थितीत सुधारणा झाल्याचा दावा सातत्याने केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपकडून केला जातो. तशात अधिकारी यांची काश्मीरविषयक प्रतिकूल टिप्पणी स्वपक्षाचीच राजकीय अडचण करणारी ठरली आहे. त्यातून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील नेते आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना पुढे सरसावले. जम्मू-काश्मीरमधील जनता अस्सल भारतीय आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकाच्या हृदयात भारत आहे. दहशतवादाविरोधात लढताना काश्मीरमधील अनेक तरूणांनी जीवाचे बलिदान दिले. प्रत्येक भारतीयाने जम्मू-काश्मीरमध्ये यावे. अधिकारी यांनाही मी काश्मीर भेटीचे निमंत्रण देतो. त्यांना काश्मिरी जनतेच्या देशभक्तीचा आणि राष्ट्रवादाचा अनुभव घेता येईल, असे त्यांनी म्हटले. त्यातून रैना यांनी स्वपक्षाच्याच अधिकारी यांना अप्रत्यक्षपणे फटकारल्याचे मानले जात आहे.