लक्षवेधी: शाश्‍वत ऊर्जापर्याय आणि आव्हाने

प्रा. रंगनाथ कोकणे

आज संपूर्ण जगभरात ऊर्जेचा मुबलक वापर ही बाब आधुनिक जीवनशैलीचे अभिन्न अंग बनली आहे. ऊर्जा ही कधी ना कधी संपणारी बाब असून पारंपरिक स्रोत आटत चालल्यामुळे जगभरातील बहुतांश देशांना ऊर्जा टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच शाश्‍वत ऊर्जा वापराला प्राधान्य देणे गरजेचे ठरत आहे. शाश्‍वत ऊर्जेच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.

एकीकडे ऊर्जेचा बेसुमार वापर आणि दुसरीकडे स्रोतांत होणारी घट यामुळे भविष्यकाळात ऊर्जा टंचाई उग्र रूप धारण करण्याची शक्‍यता आहे. पारंपरिक स्रोतांच्या आधारे होणारी ऊर्जा ही खर्चिक, प्रदूषणात भर घालणारी आणि एक ना एक दिवस संपणारी आहे. त्यामुळे पर्यायी शाश्‍वत, अक्षय ऊर्जेचा वापर करण्याची वेळ आली आहे. भारतात सौर आणि पवन ऊर्जा स्रोतांचे विपूल प्रमाण आहे. यानुसार केंद्र सरकारने या स्रोतांचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. म्हणूनच सध्याचे 80 गिगावॅट उत्पादनाला 2022 पर्यंत दुप्पट म्हणजे 225 गिगावॅट उत्पादन करण्याचे ध्येय निश्‍चित केले आहे. अशा प्रकारचे ध्येय निश्‍चित करणारा भारत एकमेव देश आहे. सध्या अर्थव्यवस्थेची आणि पर्यावरणाची मोठी किंमत मोजून आपण पाणी, अणू यासारख्या पारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर करत आहोत. मात्र, त्याऐवजी स्वस्त आणि कार्बनरहित पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांवर काम करण्याची गरज आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात जैविक पदार्थ, सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायोगॅस आणि जलविद्युत प्रकल्पाचे स्रोत आहेत. मात्र, या ऊर्जा निर्मितीसाठी आवश्‍यक असणारी उपकरणे ही भारतात तयार होत नाहीत. त्यामुळे बहुतांश उपकरण आयात केले जातात. तीन वर्षांत सौरऊर्जेसाठी 90 टक्‍के उपकरण आयात केले गेले. त्यामुळे वीजनिर्मितीचा खर्च वाढण्यास हातभार लागतो. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडतो. शाश्‍वत, अक्षय ऊर्जा उत्पादनाचे देशभरात अनेक लहान-मोठे मार्ग आहेत. परंतु त्यांना एका ग्रीडमध्ये आणणे आव्हानात्मक काम आहे. विजेच्या गुणवत्तेवरही त्याचा परिणाम होतो.

आधुनिकतेकडे वाटचाल करताना जगासाठी ऊर्जेच्या या स्रोतांचा आणि संसाधनाचा उपयोग करावा लागत आहे. अशा स्थितीत आगामी काळात ऊर्जेचे स्रोत संपल्यास काय करावे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. म्हणूनच या समस्येने उग्र रूप धारण करण्याचे संकेत मिळत असताना बिगर पारंपरिक स्रोतांचा शोध घेणे अत्यावश्‍यक ठरले आहे. अर्थात, या स्रोतांपासून पर्यावरणाची हानी होणार नाही आणि स्रोतही आटणार नाही.

ऊर्जेचा पर्यावरणाशी थेट संबंध आहे. सध्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारे पारंपरिक स्रोत हे पर्यावरणाला हानिकारक आहेत. ही हानी कमी करण्यासाठी आणि प्रदूषण विरहित ऊर्जा निर्मिती करण्यासाठी शाश्‍वत ऊर्जा ही पारंपरिक स्रोतांला उत्तम पर्याय आहे. शाश्‍वत ऊर्जेचा स्रोत हे सूर्य, पाणी, हवा आदी आहेत. हे स्रोत पर्यावरणपूरक आहेत. त्यांची हानी देखील होत नाही. सौरऊर्जा, पवनऊर्जा, जल विद्युत ऊर्जा, जैव इंधन आदी शाश्‍वत ऊर्जेचे उत्तम उदाहरणे आहेत. आपल्याकडे शाश्‍वत ऊर्जेच्या विविध स्रोतांचा विपूल साठा आहे. याअनुषंगाने देशाला विकसित करताना या प्रदूषणरहित स्रोतांचा योग्य तऱ्हेने वापर करण्याची गरज आहे. या कारणामुळेच भारत सरकारने 2004 रोजी शाश्‍वत ऊर्जेच्या विकासासाठी जनजागृती अभियान राबविले आणि शाश्‍वत ऊर्जा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

आज देशात ऊर्जेची मागणी आणि पुरवठा यातील अंतर वाढत चालले आहे. राष्ट्रीय पॉवर पोर्टलनुसार सध्या देशात साडेतीन लाख मेगावॅटपेक्षा अधिक वीज उत्पादन केले जात आहे. परंतु हे उत्पादन आपल्या मागणीच्या तुलनेत अडीच टक्‍के कमी आहे. शाश्‍वत ऊर्जेला प्रोत्साहन दिल्याने मागणी आणि पुरवठा यातील अंतर कमी होऊ शकते. यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सामाजिक जीवनाचा स्तरही उंचावेल. सध्याची भारतातील वीजनिर्मिती खर्चिक आहे. कारण स्रोत जरी भारतातील असले तरी त्याची उपकरणे ही आयात करावी लागतात. त्यामुळे साहजिकच वीज उत्पादनाचा खर्च वाढतो. बहुतांश उपकरणे ही परदेशी बनावटीची आहेत. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे देशातच वीजनिर्मितीचे उपकरणे तयार होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

विसाव्या ऊर्जा सांख्यिकी अहवालानुसार 2011-12 पासून 2016 या काळात प्रति व्यक्‍ती ऊर्जेचा खर्च हा 3.54 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. अन्य आकडेवारी पाहिल्यास 2005-06 पासून 2018-19 यादरम्यान प्रति व्यक्‍तीचा विजेचा उपयोग हा दुप्पट नोंदला गेला. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या एप्रिल 2019 च्या अहवालानुसार देशात प्रति वर्ष 1181 किलोवॅट विजेचा उपयोग केला जात आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे वाढती लोकसंख्या. वीज आणि इंधनच्या रूपाने वापरात येणाऱ्या ऊर्जेची घरगुती आणि कृषी क्षेत्राबरोबरच उद्योग क्षेत्रातही मागणी वाढत आहे.

औद्योगिक क्षेत्रातही पारंपरिक स्रोतांपासून निर्माण होणाऱ्या एकूण विजेचा 58 टक्‍के वापर केला जातो. याशिवाय कृषी क्षेत्र आणि घरगुती कार्यासाठी देखील ऊर्जेची मागणी आणि वापर वाढला आहे. ज्या विजेपासून आपण आपले घर, व्यवसाय, कार्यालय उजळून टाकतो किंवा शेती आणि उद्योगासाठी त्याचा वापर करतो आणि ज्या विजेच्या जोरावर आपण विकास योजना राबवतो त्या विजेसाठी आपण किती किंमत मोजतो, हे ठाऊक आहे काय? ही किंमत केवळ अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी नाही तर पर्यावरणाला देखील हानी पोचवणारी आहे. भारतात थर्मल पॉवर स्टेशनमध्ये वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशामुळे हवेत प्रदूषण होते. सार्वजनिक क्षेत्रात 125 हून अधिक थर्मल पॉवर स्टेशनमधून दररोज सुमारे 18.17 लाख टन कोळसा वापरण्यात येतो. यावरून प्रदूषणाचे प्रमाण आपल्या लक्षात येईल. वीजनिर्मितीनंतर तयार होणारी राख देखील चिंतेची बाब आहे.

शेवटी, शाश्‍वत ऊर्जा वापरणे हे आता गरजेचे ठरत आहे. आजच्या स्थितीला पर्यावरणाला वाचवण्यासाठी आणि नैसर्गिक स्रोतांची जपवणूक करण्यासाठी शाश्‍वत ऊर्जेची निर्मिती करणे ही काळाची गरज बनली आहे. कार्बनरहित ऊर्जानिर्मिती ही अत्यावश्‍यक बाब ठरत आहे. शाश्‍वत ऊर्जेसाठी व्यापक मोहीम हाती घेण्याबरोबरच वीज बचतीची देखील सवय लावणे महत्त्वाचे ठरत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×