खून करताना सुशीलकुमारनेच व्हिडिओ बनवला; पोलिसांचा दावा

नवी दिल्ली, दि. 24 – तरुण कुस्तीगाराच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन वेळेला ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशीलकुमारने कुस्तीक्षेत्रात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी त्याचा खून करताना मित्राला त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला लावला होता, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी सोमवारी दिली. दरम्यान, रेल्वेच्या सेवेत असणाऱ्या सुशीलकुमारला सेवेतून निलंबित करण्याच्या हालचाली रेल्वेने सुरू केल्या आहोत.
सुशीलकुमारला कुस्तीच्या क्षेत्रात आपला असणारा दबदबा कायम ठेवायचा होता. आपल्याला भविष्यात कोणीही विरोध करू नये, अशी त्याची इच्छा होती त्यामुळे त्याने हत्या करत असताना त्याचा व्हिडिओ बनवला, अशी माहिती दिल्ली पोलिसांतील सूत्रांनी दिली.
सुशीलकुमारचा सहकारी पैलवान आणि कुस्तीगीर सागर धनकड या तो आणि त्याचे मित्र बेदम मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ आहे. छत्रसाल स्टेडियमवर दोनवेळा कनिष्ठ राष्ट्रीय विजेता असणाऱ्या सागरची बेदम मारहाण करून त्याला अत्यवस्थ अवस्थेत सोडून सुशीलकुमार आणि त्याचे सोनू आणि अमित कुमार हे साथीदार पसार झाले होते.
सुशीलकुमारने त्याचा मित्र प्रिन्सला त्याचा हा व्हिडिओ बनवण्यास सांगितले होते. तो आणि त्याचे सहकारी सागरला एखाद्या जनावराने शिकारीत आदळावे तसे आपटत होते. त्यांना कुस्तीच्या क्षेत्रात त्यांची दहशत निर्माण करायची होती, असे पोलिसांनी सांगितल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
दरम्यान, उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ व्यावसायिक व्यवस्थापक असणाऱ्या सुशीलकुमारची नियुक्ती दिल्ली सरकारने छत्रसाल स्टेडियमवर शालेय मुलांच्या खेळाच्या सुविधा वाढवण्यासाठी विशेष कार्य अधिकारी म्हणून केली आहे. त्याला अटक झाल्यानंतर निलंबित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
रेल्वेला त्याच्या प्रकरणाचा अहवाल दिल्ली सरकारकडून प्राप्त झाला आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्यामुळे त्याला निलंबित केले जाईल, असे उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत त्याच्या निलंबनाचे आदेश निघण्याची शक्यता आहे.





