Pune rave party case : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण: त्या तीन महिलांचा पार्टीशी….; पोलिसांनी केलेला दावा, पण आता काय सांगितलं?

Pune rave party case : पुण्यातील खराडी परिसरातील पंचतारांकित हॅाटेलमधील हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी सुरूवातीला या प्रकरणात तीन तरुणी हॅाटेलच्या परिसरात संशयास्पदरित्या दिसल्याचा दावा केला होता. मात्र, आता पोलिसांनी केलेला हा दावा फोल ठरला आहे.
पोलिसांनी त्या महिलांचा या पार्टीशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने खराडीतील पंचतारांकित हॅाटेलमध्ये रविवारी धाड टाकत ड्रग्स पार्टीवर मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी तीन महिला हॅाटेल परिसरात दिसल्याचा दावा केला होता. न्यायालयातही पोलिसांनी याबाबत सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात या महिलांचा पार्टीशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाला आता तीन दिवस पूर्व होऊनही पोलिसांनी कारवाईत जप्त केलेले अंमली पदार्थांचा पुरवठा कोणी आणि कसा केला याबाबत माहिती समोर आलेली नाही.
या प्रकरणात पोलिसांनी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावाई डॅा. प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन ग्रॅम ७० मिली ग्रॅम कोकेनसदृश ड्रग्ज आणि ७० ग्रॅम गांजा असे अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पार पडली. न्यायलयाने चार पुरुष आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली, तर दोन महिला आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सखोल चौकशी करावी
ड्रग्ज पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे व्हिडीओ कोणी काढले आणि कोणामार्फत व्हायरल झाले याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे.





