Suryakumar Yadav : टी-२० कर्णधार सूर्याची मोठी अपडेट; शस्त्रक्रियेनंतर कधी दिसणार मैदानावर?

Suryakumar Yadav Sports Hernia Surgery : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या जर्मनीत आहे. जर्मनीतील म्युनिख शहरात सूर्यकुमार यादवची स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. याबाबत स्वत: सूर्याने इन्स्टावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. तो आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरल होता. यानंतर तो टी-२० मुंबई लीगमध्येही खेळताना दिसला होता.
सूर्या मैदानावर कमबॅक करण्यासाठी उत्सुक –
३४ वर्षीय सूर्यकुमारने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर केला आणि त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. रोहित शर्मानंतर बीसीसीआयने त्याला टी-२० संघाची धुरा सोपवली आहे. शस्त्रक्रियेमुळे तो बांगलादेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी आहे. त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ ते १२ आठवडे लागतील. पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे नेतृत्व करेल.
सूर्यकुमार यादवने शेअर केली इन्स्टा पोस्ट –
View this post on Instagram
सूर्यकुमार यादवने पोटाच्या उजव्या बाजूला असलेल्या स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. सूर्याने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. त्याने लिहिले, “जीवनातील अपडेट: पोटाच्या खालच्या उजव्या भागात स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. मला आनंद आहे की शस्त्रक्रियेनंतर मी बरा होत आहे. लवकरच मैदानावर परतण्यासाठी उत्सुक आहे.”
हेही वाचा – ICC New Cricket Rules : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नवीन नियम जाहीर, कोणते आहेत? जाणून घ्या
सूर्या टी-२० संघासाठी महत्त्वाचा खेळाडू –
सूर्यकुमार यादव हा भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये अनेक शानदार खेळी केल्या आहेत. त्याचे चाहते त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. तेथे भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यानंतर संघ बांगलादेश दौऱ्यावर जाईल. बांगलादेशमध्ये एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली जाईल. पहिला टी-२० सामना २६ ऑगस्ट रोजी आणि शेवटचा सामना ३१ ऑगस्ट रोजी होईल.





