ICC New Cricket Rules : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नवीन नियम जाहीर, कोणते आहेत? जाणून घ्या

कसोटी क्रिकेटमधील स्टॉप क्लॉक नियम –
आयसीसीने कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम वनडे क्रिकेटमध्ये आधीपासून वापरला जात आहे. यानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मागील षटक संपल्यानंतर एका मिनिटाच्या आत पुढील षटक सुरू करण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही, तर पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दोन वॉर्निंग देतील. या वॉर्निंगनंतरही नियमभंग सुरू राहिल्यास, गोलंदाजी करणाऱ्या संघावर पाच धावांचा दंड आकारला जाईल. 80 षटकांनंतर पंचांनी दिलेले सर्व वॉर्निंग झिरो होतील. हा नियम डब्ल्यूटीसी २०२५-२७ पासून लागू आहे.
चेंडू बदलण्याचा निर्णय पूर्णपणे पंचांवर –
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
🔹 The ICC has introduced a stop clock to control over rates in Tests.
🔸 No mandatory ball change for the deliberate use of saliva.
🔹 New protocols introduced in the DRS review system for out decisions.
🔸 If a catch is unclear and the fielders… pic.twitter.com/DLzG8EjZVd— Sportskeeda (@Sportskeeda) June 26, 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी कायम आहे. यापूर्वी गोलंदाज लाळ लावून चेंडू खराब करत आणि नवीन चेंडू मागत, जेणेकरून त्यांना गोलंदाजीमध्ये फायदा मिळेल. आता आयसीसीने नियम बनवला आहे की, चेंडूवर लाळ लागल्यास चेंडू बदलणे बंधनकारक नाही. चेंडू पूर्णपणे ओला किंवा खराब झाल्यासच तो बदलला जाईल. चेंडू बदलण्याचा निर्णय पूर्णपणे पंचांच्या विवेकावर अवलंबून आहे. यामुळे पंचांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत.
नो-बॉलवर झेल घेतल्यास तपासणी होईल –
समजा, एखाद्या चेंडूवर मैदानी पंचांना झेलाबाबत शंका आहे आणि ते चर्चा करत आहेत. तेव्हा टीव्ही पंच सांगतात की तो चेंडू नो-बॉल होता. यापूर्वी फलंदाजी करणाऱ्या संघाला एक धाव मिळायची आणि झेल योग्य आहे की नाही याची चर्चा होत नसे. आता नव्या नियमांनुसार, तिसरा पंच झेल योग्यरित्या घेतला गेला आहे की नाही हे तपासेल. जर झेल योग्य असेल, तर फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त एक धाव मिळेल. जर झेल अयोग्य असेल किंवा चेंडू खाली पडला असेल, तर नो-बॉलच्या धावांबरोबरच फलंदाजांनी धावलेल्या धावाही मिळतील.
शॉर्ट रन घेतल्यास पाच धावांचा दंड –
आतापर्यंत फलंदाज शॉर्ट रन घेताना पकडला गेल्यास, फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावांचा दंड भरावा लागायचा. आता नव्या नियमांनुसार, जर फलंदाजाने मुद्दाम शॉर्ट रन घेतले, तर पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला कोणत्या फलंदाजाला स्ट्राइकवर ठेवायचे हे ठरवण्यास सांगतील. याशिवाय पाच धावांचा दंडही लागेल.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पूर्णवेळ बदली खेळाडू –
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू गंभीर जखमी झाल्यास, आयसीसीने बोर्डांना त्यांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पूर्णवेळ बदली खेळाडू मैदानात उतरवण्याचा प्रयोग करण्यास सांगितले आहे. हा खेळाडू कन्कशन बदलीप्रमाणे कार्य करेल. बदली खेळाडूला परवानगी देण्यापूर्वी पंचांना जखम स्पष्ट दिसली पाहिजे. हा नियम हॅमस्ट्रिंग किंवा किरकोळ जखमांसाठी लागू होणार नाही. हा नियम प्रयोगाच्या आधारावर आहे आणि तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लागू करणे पूर्णपणे देशांवर अवलंबून आहे.





