Suryakumar Yadav Welcome : विश्वविजेत्या कर्णधाराचं ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; मायदेशी परतताच सूर्याच्या ‘या’ कृतीने जिंकली मनं
Suryakumar Yadav Welcome : भारताला विश्वचषक जिंकून देणारा तिसरा कर्णधार ठरलेला सूर्यकुमार यादव जेव्हा मुंबईतील चेंबूर येथील आपल्या निवासस्थानी पोहोचला, तेव्हा तिथे चाहत्यांनी जंगी स्वागत केले.

Suryakumar Yadav Welcome in Mumbai : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करून भारतीय खेळाडू आता आपापल्या घरी परतले आहेत. भारताला विश्वचषक जिंकून देणारा तिसरा कर्णधार ठरलेला सूर्यकुमार यादव जेव्हा मुंबईतील चेंबूर येथील आपल्या निवासस्थानी पोहोचला, तेव्हा तिथे चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
औक्षण अन् ढोल-ताशांचा गजर –
चेंबूरमध्ये पोहोचताच सूर्याचे मराठमोळ्या पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आले. सर्वात आधी त्याचे औक्षण करण्यात आले, त्यानंतर शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘सूर्या-सूर्या’च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी सूर्यानेही चाहत्यांना निराश केले नाही; त्याने कोणासोबत फोटो काढले, तर कोणाला बॅटवर ऑटोग्राफ दिला.
सूर्याचं पुढचं लक्ष्य: ऑलिम्पिक सुवर्णपदक!
Mumbai, Maharashtra: T20 World Cup-winning captain Suryakumar Yadav receives a warm welcome as he arrives at his residence pic.twitter.com/wFPdB1V7sb
— IANS (@ians_india) March 10, 2026
विजयानंतर ‘पीटीआय’शी बोलताना सूर्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “२०२४ आणि २०२६ मध्ये लागोपाठ ट्रॉफी जिंकणे हे स्वप्नवत आहे. मायदेशात विश्वचषक जिंकण्याचा आमचा निर्धार होता आणि तो पूर्ण झाला. आता आमचे पुढचे लक्ष्य भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देणे हे आहे. देशाला जास्तीत जास्त ट्रॉफी जिंकून देण्याचा माझा प्रयत्न असेल.”
मराठीत साधला संवाद: “आता दोन दिवस मस्त झोपणार”
VIDEO | Exclusive: Captain of India’s T20 World Cup winning team Surya Kumar Yadav receives a rousing welcome as he reaches his residence. He says, “I feels really great to win back-to-back trophies. After winning the T20 World Cup in 2024, we thought it will be great if we win… pic.twitter.com/cdjO4NmhV5
— Press Trust of India (@PTI_News) March 10, 2026
चेंबूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सूर्याने चक्क मराठीत संवाद साधून सर्वांची मने जिंकली. सूर्या म्हणाला, “माझा क्रिकेट प्रवास चेंबूरपासूनच सुरू झाला होता, त्यामुळे विश्वचषक जिंकून इथे परतणं खूप छान वाटतंय.” जेव्हा त्याला पुढच्या रणनीतीबद्दल विचारले, तेव्हा त्याने आपल्या खास शैलीत मजेत उत्तर दिले, “आता घरी जाणार, जेवणार आणि दोन दिवस मस्त झोपणार!”
टीम इंडियाच्या नावावर ८ ट्रॉफींची नोंद –
भारताने आपली पहिली आयसीसी ट्रॉफी १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकली होती, तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे एकही खिताब नव्हता. भारताने आतापर्यंत २ वेळा वनडे विश्वचषक (१९८३, २०११) आणि विक्रमी ३ वेळा टी-२० विश्वचषक (२००७, २०२४ आणि २०२६) जिंकला आहे. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचा रेकॉर्ड चांगला असून संघाने ३ वेळा (२००२, २०१३ आणि २०२५) हे जेतेपद पटकावले आहे. भारताला अजूनही जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (WTC) गदेची प्रतीक्षा आहे.





