विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा सत्कार ! कर्णधार रोहित शर्मासह सूर्याकुमार, शिवम आणि यशस्वीचा गौरव

मुंबई – विश्वविजेत्या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार सोहळा पार पडला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र विधानभवनात पहिल्यांदाच अशा प्रकारचा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी रोहित शर्माने मराठी शैलीत सर्वांना अभिवादन करत म्हटले की, सर्वांना माझा नमस्कार. येथे बोलावल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खूप खूप आभार. आमच्यासाठी विधानभवनात असा कार्यक्रम केला, त्याबद्दल आभार.
काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होते. विश्वकरंडक जिंकणे हे आमचे स्वप्न होते. 2023 मध्ये संधी हुकली. सूर्या, दुबे किंवा माझ्यामुळे हे झाले नाही, असे नाही तर हे सर्वांमुळे सिद्ध झाले आहे. सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यामुळे हे होऊ शकले. प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता, असे रोहित शर्मा म्हणाला.





