पुणे | सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा बावधन येथील सूर्यदत्त नॅशनल स्कूलने कायम राखली आहे.
दहावीमध्ये आर्जवी पाठक ९७.४० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम आली आहे. प्रज्ञोत राज सिंग (९५.४० टक्के) व साची गाडे (९२.६० टक्के) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकवला आहे. आर्जवी पाठक हिला गणितामध्ये, तर साची गाडे हिला सामाजिक शास्त्रामध्ये १०० गुण मिळाले आहेत.
बारावीमध्ये विज्ञान शाखेत हरगुन कौर मथेरू ९८.४० टक्के गुणांसह शाळेत प्रथम आली आहे. श्रीश कदम याने विज्ञान शाखेतून ९६.६० टक्के गुण मिळवले, तर ऋता काशीकर, गायत्री कुंवर, सारा हरारी या तिन्ही विद्यार्थिनींना ९५.८० टक्के गुण मिळाले. बोर्ड परीक्षेत १४० विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थ्यांना एकूण ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत.
हरगुन कौर मथेरू आणि ऋता काशीकर या विद्यार्थिनींना इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस विषयात, तर आर्यन पुराणिक याला गणित विषयात १०० गुण मिळाले आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. निकालातील सातत्य आणि शिक्षक व विद्यार्थ्यांतील सदृढ नाते यामुळे सर्वोत्तम कामगिरी शक्य होत असल्याचे मत डॉ. चोरडिया यांनी व्यक्त केले.





