पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिवसेनेच्या फुटीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुण्यात शिवसेना-ठाकरे आणि शिवसेना-शिंदे या दोन्ही पक्षअस्तित्वासाठी लढणार असल्याचे चित्र आहे. २००९ च्या निवडणुकीत शहरातील आठपैकी तीन विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार होते. पण, गेल्या दशकभरात शिवसेनेकडून पुण्यात संघटनात्मक बांधणीकडे लक्ष दिले न गेल्याने पक्षाला मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर भाजपसोबत महायुतीत गेलेल्या शिंदे गटाला पुण्यात एकही जागा मिळणार नसल्याचे समोर आले आहे. तर ठाकरेंच्या पक्षाला महाविकास आघाडीत केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांपुढे मुंबईनंतर राज्यातील सर्वांत मोठे शहर असलेल्या पुण्यात अस्तित्वासाठी झगडत असल्याची स्थिती आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला (शिंदे) एकही जागा दिली जाणार नसल्याचे समोर आले आहे. शहरात भाजप ६ जागा लढण्यावर ठाम असून, दोन जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) यांना दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. शहरात कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोंन्मेंट, खडकवासला आणि कसबा या सहा जागा भाजपला; तर हडपसर आणि वडगावशेरी या दोन जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून हडपसर विधानसभेच्या जागेची मागणी करण्यात येत आहे. तसेच पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे हे इच्छूकही आहेत. मात्र, सध्या ही जागा राष्ट्रवादीकडे असून पक्षाने त्या ठिकाणी कामही सुरू केले आहे. परिणामी, शिवसेनेला पुण्यात एकही जागा नसल्याचे स्पष्ट झाले असून पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्याची चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची एका जागेवर बोळवण शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुण्यात महाविकास आघाडीत कोथरूडची जागा मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पक्षाकडून माजी गटनेते पृथ्वीराज सुतार आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी तयारी सुरू केली आहे. तर, ठाकरेंकडून वडगावशेरी आणि पर्वतीचीही मागणी करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादी काॅंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून वडगावशेरीत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा पक्षात प्रवेश करून घेतला आहे. पर्वती मतदारसंघावरून काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीत तिढा आहे. तर ठाकरेंच्या नेत्यांकडून इच्छुकांना पुण्यापेक्षा मुंबई महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही जागाही ठाकरेंच्या शिवसेनेने सोडल्याचे पक्षातील इच्छूकच सांगत आहेत.