Pune Crime : सूरज ठोंबरे टोळीवर मोक्का; भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई
Pune Crime : पुण्यातील सूरज ठोंबरे टोळीवर भारती विद्यापीठ पोलिसांची मोक्का कारवाई. शिवाजीनगर न्यायालयातून पोलीस ताफ्याची रेकी केल्याचा आरोप; पाच जणांवर कारवाई.

Pune Crime : गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात सूरज अशोक ठोंबरे टोळीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, शस्त्राचा वापर, जीवे मारण्याची धमकी, मारामारी, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे आणि फौजदारी कट रचणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये टोळीचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सूरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ), वेदांत रोहित सावंत (वय २१, रा. धनकवडी), अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१, रा. गुजरवाडी, कात्रज, मूळ रा. नाझरे, ता. भोर, जि. पुणे), धीरज लखारा (रा. धनकवडी) आणि मानव शरद ढमाले (वय २४, रा. धनकवडी) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ते २६ जुलै २०२६ दरम्यान गुजरवाडी-कात्रज आणि शिवाजीनगर परिसरात आरोपींनी संगनमत करून फौजदारी कट रचला. आयुष कोमकर आणि गणेश काळे यांच्या हत्येचा तसेच अक्षय म्हस्के याच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आल्याचा आरोप आहे.
२६ जुलै रोजी आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर, स्वराज वाडकर आणि तुषार वाडकर यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस वाहनातून धुळे आणि नंदुरबार येथे नेण्यात येत होते. त्या वेळी वेदांत सावंत, अथर्व खोपडे आणि धीरज लखारा यांनी मानव ढमालेच्या सांगण्यावरून संगनमताने अथर्व खोपडे याच्याकडील अग्निशस्त्रासह ॲक्टिव्हावरून शिवाजीनगर न्यायालयापासून कुरोळी, चाकणपर्यंत वाहन ताफ्याची रेकी केल्याचे तपासात समोर आले.
रेकीदरम्यान आरोपींनी ताफा कोणत्या मार्गाने जात आहे, त्याच्यासोबत किती पोलीस बंदोबस्त आहे आणि तो नेमका कोणत्या ठिकाणी पोहोचला आहे, याची माहिती फोनद्वारे सूरज ठोंबरे याला दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९१/२०२६ दाखल असून भारतीय न्याय संहिता कलम ५५, ६१(१), ३(५), भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), (२), (३) सह १३५ अन्वये २७ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान आरोपींनी प्रत्येक गुन्ह्यात काही सामाईक, तर काही नवीन साथीदार सोबत घेऊन स्वतःची संघटित टोळी तयार केल्याचे निष्पन्न झाले. अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने टोळीने गंभीर गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले. आरोपींच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) समाविष्ट करण्याचा प्रस्ताव भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याकडे सादर केला.
प्रकरणाची छाननी केल्यानंतर २६ ऑगस्ट २०२६ रोजी मोक्का कलमांचा समावेश करण्यास मंजुरी देण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, भारती विद्यापीठ विभाग, हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष जाधव, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलीस अंमलदार विशाल वारुळे, श्रीकांत कुलकर्णी, स्वप्नील बांदल आणि सचिन सरपाले यांनी या कारवाईत सहभाग घेतला.





