Pune News : पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून सुप्रिया सुळेंचा संताप; पोस्ट करत CM फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी, प्रकरण काय?
Pune News : पुण्यातील कोथरुड पोलिस ठाण्यात जबरदस्तीने बोलावून मारहाण करत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पोलिसांवर करण्यात येत आहे. श्वेता एस व्ही यांनी कोथरुड पोलिस ठाण्याच्या बाहेरून फेसबुक लाईव्ह करत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र, पोलिसांंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला ‘व्हॉट्सॲप’वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी ट्वीट करत केला आहे.
पोलिसांचे स्पष्टीकरण
पीडित मुलींच्या आरोपानुसार, पोलिसांनी त्यांना वाईट भाषेत बोलावलं, त्यांच्या कपड्यांवरून आक्षेप घेतले आणि जातीवाचक शब्द वापरून मारहाण केली. या घटनेबाबत कोथरुड पोलिसांनी “तपासाच्या भाग म्हणून प्रश्न विचारण्यात आले. कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा अपमान झालेला नाही,” असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर येथील एक विवाहित महिला सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात कोथरुडमध्ये राहणाऱ्या तीन मैत्रिणींकडे एक दिवसासाठी आली होती. संबंधित महिलेची हरल्याची तक्रार संभाजीनगरमध्ये दाखल करण्यात आली होती. पोलीस तिचा मोबाईल ट्रक करत कोथरुडपर्यंत पोहचले. त्यांनी या तीन मुलींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली. यानंतर पोलिसांनी या तिघींना ताब्यात घेऊन कोथरुड पोलीस ठाण्यात नेले. येथील रिमांड रुममध्ये पोलिसांनी या तिन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.





