Jay pawar | Rutuja patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून आज (दि. 10) पुण्यात त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार यांचं लग्न पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी संपुर्ण पवार कुटुंब एकत्र येणार असून मोजकेच नातेवाईक आणि पक्षातील पदाधिकारी उपस्थित असतील, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, यावर जय पवार यांच्या आत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता. मला आमंत्रण दिलं आहे. अर्थातच आमंत्रण दिल्यावर जाणारच. सदानंद सुळे, सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे जाणार आहेत. बाकीच्याचं मला माहीत नाही” असं त्या यावेळी म्हणाल्या. मात्र, या सोहळ्याला शरद पवार जाणार की नाही याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती त्यांनी दिली नाही. कोण आहेत ‘ऋतुजा पाटील’? खासदार सुप्रिया सुळेंनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाचा जय पवार यांचं लग्न सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे फलटणचे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत होणार आहे. तर, जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर आता दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्सचे पाटील यांच्या घराच्या सुनबाई आहे. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. व्यवसाय ते राजकारण, जय पवार यांचा प्रवास…. पार्थ पवार हे अजित पवार यांचे थोरले चिरंजीव तर जय पवार हे धाकटे चिरंजीव आहेत. जय पवार यांचा उद्योग व्यवसायाकडे जास्त कल आहे. दुबईत काही वर्षे त्यांनी व्यवसाय केला आहे. सध्या मुंबई, बारामती येथे ते व्यवसाय पाहत असल्याचे सांगितले जाते. परंतु घरातच राजकारण असल्याने तसेच आई-वडील दोघेही लोकप्रतिनिधी असल्याने सामान्यांच्या प्रश्नांची -सोडवणूक करण्याकरिता ते ही राजकारणातही सध्या सक्रिय होत असल्याचे दिसते.