Supriya Sule: २०० आमदारांचे सरकार असूनही आंदोलने का थांबत नाहीत? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल
Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची पिंपरीत संघटनात्मक बैठक; नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच 'जनता दरबार' भरवणार.

Supriya Sule – राज्यात दोनशे आमदारांचे सरकार आहे. असे असूनही या सरकारला विरोध आणि न्याय हक्कांसाठी होणारी आंदोलने थांबण्याचे नाव घेत नाहीत, हे दुर्दैवी आहे. विविध घटकांच्या आंदोलनांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा असे देखील खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी
(दि. ८) पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक घेतली. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासह शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या संघटनात्मक बैठकीस शहराध्यक्ष तुषार कामठे, सुलक्षणा शिलवंत, सुनील गव्हाणे, विशाल वाकडकर, युवक अध्यक्ष इम्रान शेख, जयंत शिंदे, देवेंद्र तायडे, ज्योती निंबाळकर, संदीप चव्हाण, योगेश सोनवणे, काशीनाथ जगताप,
रजनीकांत गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामाबाबत मार्गदर्शन केले. मी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या मागणी नुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्यांसाठी जनता दरबार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंजवडीसह मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर सरकारवर टीका करत हिंजवडीचा महापालिकेत समावेश करण्याच्या प्रश्नावर स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारने चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा,अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. मात्र, निर्णय काहीही असो, हिंजवडीसह महाराष्ट्रातील नागरिकांना रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यात विविध समाजघटक, विद्यार्थी आणि नागरिक आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मनोज जरांगे, एमपीएससी विद्यार्थी, आदिवासी समाज, ओबीसी समाज, धनगर समाज यांच्यासह विविध घटकांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.





