Supriya Sule: पाणीवाटपात कोणावरही अन्याय नको
Supriya Sule:

खासदार सुप्रिया सुळे; राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर
Supriya Sule: राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणी आणि चार्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. अशा परिस्थितीत शहर आणि ग्रामीण भागातील पाणीवाटपात कोणावरही अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
विधानभवन येथे कालवा समितीच्या बैठकीनंतर सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल सुळे यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे हे यश मिळाले आहे. आता हुरळून न जाता पुढील कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, याबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे. पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली असून, पक्षाची स्थापना आणि पक्ष चालविण्याची प्रक्रिया या वेगवेगळ्या बाबी आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर अन्याय केल्याची आमची भूमिका आहे, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पर्यावरणातील बदलांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, असेही सुळे म्हणाल्या.
सरकारने स्पष्टीकरण द्यावे
सरकारला वाटेल तेव्हा निवडणुका घेतल्या जातात, असे चित्र आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मात्र, काही जिल्हा बँकांच्या निवडणुका होत असताना पुणे जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलली, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी सुळे यांनी केली.





