Supriya Sule: “एकमत नाही झाले तर…”; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून सुप्रिया सुळेंचे थेट वक्तव्य
Supriya Sule: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी घेतलं शंभू महादेवाचं दर्शन; कारखान्याच्या अस्वस्थतेवर भाष्य करत सुचवले मोठे संकेत.

Supriya Sule – श्रावण महिन्याचे औचित्य साधत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमेश्वर (करंजे) येथील श्री शंभू महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेत विधिवत पूजा-अर्चा केली. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणातील हॉलमध्ये त्यांनी नागरिक, सभासद आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुळे यांच्या सोमेश्वर दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सोमेश्वर कारखान्याच्या बाबतीत सगळीकडे अस्वस्थता जाणवत आहे. सोमेश्वर कारखाना हा सहकार चळवळीतील महत्त्वाचा कारखाना आहे. त्यामुळे कारखान्याच्या बाबतीत कुठलेही राजकारण न आणता तो चांगल्या पद्धतीने चालवला गेला पाहिजे.” कारखान्याची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींनी सभासद आणि कारखाना या दोन्हींना केंद्रबिंदू मानून काम करणे गरजेचे असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.

सोमेश्वरनगर (ता. बारामती) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सभासदांशी संवाद साधला.
“जो कोणी जबाबदारी घेणार आहे, त्यांनी ती घ्यावी. एकमताने निर्णय झाला तर आनंदच आहे. माझा नेहमीच प्रयत्न असतो की, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचे,” असेही त्यांनी सांगितले. सोमेश्वर कारखाना हा केवळ उद्योग नसून चार तालुक्यातील हजारो सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या जीवनाशी जोडलेली महत्त्वाची सहकारी संस्था आहे.
त्यामुळे कारखान्याचे हित आणि सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सुळे यांनी नमूद केले. आगामी निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करताना सुळे म्हणाल्या, “सभासद आणि कारखाना केंद्रबिंदू ठेवून काम केले पाहिजे. यातून जर एकमत झाले नाही, तर निवडणुकीशिवाय पर्याय नाही.” त्यांच्या या भूमिकेमुळे सोमेश्वर कारखान्याच्या आगामी निवडणुकीबाबत राजकीय चर्चेला आणखी वेग आला आहे.
दरम्यान, निंबुत येथील शशिकांत काकडे व इतर ऊस उत्पादक सभासदांनी सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ऑक्टोबर २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेल उभे करावे, अशी मागणी सभासदांनी केली आहे. पुरंदर, खंडाळा आणि बारामती पश्चिम भागातील सभासदांचा पक्षाच्या पॅनेलला प्रतिसाद असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.





