सुप्रिया सुळेंनी प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर अधिकचं बोलणं टाळलं, एकाच वाक्यात दिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या ?

Supriya Sule : पुण्याच्या राजकारणात काल एक मोठी घडामोड घडली. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जगताप यांच्या राजीनाम्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना एकाच वाक्यात प्रतिक्रिया दिली.
त्यांना मनापासून शुभेच्छा, रोज नयी सुबह होती है ! अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर दिली आहे. पुढे त्या, माझं पोट खूप मोठं आहे, असेही म्हणाल्या. तसेच सुप्रिया सुळे आणि प्रशांत जगताप यांच्यात काही तास बैठक देखील राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर झाली होती, अशी देखील माहिती समोर आली आहे. पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे. यावर देखील सुप्रिया सुळेंनी भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुका लढण्याचा प्रस्ताव अद्यापर्यंत माझ्याकडे आलेला नाही. ज्यावेळी प्रस्ताव येईल त्यावेळेस मी स्वतः तुम्हाला सांगेल, असे त्या म्हणाल्या.
येत्या १५ जानेवारीला राज्यातील २९ महापालिकांसह पुणे महापालिकेचीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला असून, जोरदार मोर्चेबांधणी पक्षाकडून केली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीत स्थानिक नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. जो निर्णय ही समिती घेईल, तो प्रस्ताव पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला जाईल. त्यानंतर प्रस्ताव अंतिम करून माननीय शशिकांत शिंदे साहेब निर्णय देतील, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याचे एक्सवरून पोस्ट शेअर करून जाहीर केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे म्हटले आहे. तसेच आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले आहेत.
पोस्टमधून व्यक्त केली भावना
जेव्हा घटनात्मक, सर्वसमावेशक राजकारण आणि द्वेषप्रेरित राजकारण यांच्यातील सीमारेषा धूसर होऊ लागतात, तेव्हा अशा परिस्थितीत तात्त्विक तडजोडी करत बसण्याऐवजी अंतर्मुख होऊन विचार करणे आणि सोपविलेल्या जबाबदारीपासून दूर जाणे, हेच श्रेयस्कर असते, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. पुणे महापालिकेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असतील तर आपण पक्षात राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रशांत जगताप यांनी अगोदरच जाहीर केली होती.
धन्यवाद…
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा आणि त्याचवेळी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही देण्याचा माझा निर्णय अतिशय शांत चित्त आणि स्पष्ट सद्सद्विवेकबुद्धीचा कौल यांचा परिपाक आहे. कुठलंही पद अथवा निवडणूक अशी तात्कालिक कारणे…— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 24, 2025
हेही वाचा : Curry Leaves Juice: कडीपत्त्याचा रस; कॅन्सरच्या संभाव्य धोक्यापासून संरक्षणासाठी घरगुती उपाय





