नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास निधीबाबत केलेल्या विधानानंतर, निवडणूक आयोगाने अश्या विधानांवर लक्ष ठेवले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. त्यामुळे माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात, तर बारामतीसारखे काम तुमच्याकडे करु शकतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नळदुर्ग नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत केले होते. यावर एका पत्रकार परिषदेत सुळे म्हणाल्या, मजबूत लोकशाहीत अशा विधानांवर लक्ष ठेवणे आयोगाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु, आजकाल अशा गोष्टी घडताना आपल्याला दिसत नाहीत. मी स्वतः निवडणूक आयोगात खटला लढवला आहे पण, सर्व कागदपत्रे असूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. आपल्याला निवडणूक आयोगावर विश्वास असला पाहिजे. परंतु, दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत समाज आणि वर्तमानपत्रांमध्ये निवडणूक आयोगाबद्दल असंतोष दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला. यावरून काँग्रेस नेते नाना पटोलेंनीही अजित पवारांसह भाजपवर सडकून टीका केली आहे. पटोले म्हणाले, अर्थमंत्री असले म्हणजे काय झाले? संविधानाने तुम्हाला तिजोरी लुटण्याचा अधिकार दिला आहे का? सत्ताधाऱ्यांनी तिजोरीचे तुकडे केलेत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. विकासाच्या नावावर मतदान मागा भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नका. तुम्ही जनतेचे नोकर आहात, पाच वर्षासाठी सत्ता तुमच्या हातात आहे. मालकासारखे बोलू नका. महाराष्ट्राची जनताच तुमचा गर्व कमी करेल. एकीकडे फडणवीस येऊन सांगतात की, मी मुख्यमंत्री आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे सांगतात की मी उपमुख्यमंत्री आहे. या लोकांनी महाराष्ट्राच्या तिजोरीचे तुकडे करून टाकलेत, अशी टीका पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, मी भाजपचा स्टार प्रचारक आहे, कितीही खर्च होऊ द्या. निवडणूक आयोगाला जे उत्तर द्यायचे ते देऊ, असे विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. यावर भाजपला सत्तेचा माज आणि घमंड आल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.