Supriya Sule : कार्यकर्त्यांना बळ देणारा करारी नेता हरपला; अनंतराव थोपटेंच्या निधनाने सुप्रिया सुळे भावूक
Supriya Sule : राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत भोर-वेल्हा तालुक्यांचा कायापालट करणाऱ्या निर्भीड नेतृत्वाला सुप्रिया सुळे यांच्याकडून आदरांजली.

Supriya Sule – राजकारण करताना समाजकारणाला प्राधान्य देऊन भोर व वेल्हा तालुक्यांच्या विकासासाठी अहोरात्र झगडणारे करारी आणि निर्भीड स्वभावाचे नेते म्हणजे अनंतराव थोपटे साहेब. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेते म्हणून ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यामुळेच ‘भोर-वेल्हा म्हणजे थोपटेसाहेब आणि थोपटेसाहेब म्हणजेच भोर-वेल्हा’ असे एक अतुट समीकरण बनले होते,
अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी, शनिवारी (दि. ६) खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भोर शहरातील निवासस्थानी जाऊन माजी आमदार संग्राम थोपटे व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) भोर तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, शहराध्यक्ष विठ्ठल शिंदे, संदीप नांगरे, विलास राऊत; शिवसेनेचे बाळासाहेब चांदेरे, रमेश कोंडे, अमोल पांगारे; तसेच भाजपचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे, उपनगराध्यक्ष ॲड. जयश्री शिंदे, गटनेते अमित सागळे, नगरसेवक सुमंत शेटे, जगदीश किरवे, गणेश मोहिते, माजी उपनगराध्यक्ष गणेश पवार आणि अमर ओसवाल उपस्थित होते.
“माजी मंत्री अनंतरावजी थोपटे यांच्या निधनाने महाराष्ट्र काँग्रेसमधील एक निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या जाण्याने भोर तालुक्यातील मावळ्यांनी आपला ‘जाणता राजा’ गमावला आहे.”
– श्रीरंग बारणे, खासदार.
“भोर आणि वेल्हा या दुर्गम तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच्या माध्यमातून आयुष्यभर झगडणारे आणि प्रत्यक्ष विकास घडवून आणणारे नेतृत्व म्हणजे अनंतरावजी थोपटे होते. राज्याच्या राजकारणात एक तत्त्वनिष्ठ आणि निष्ठावंत नेता म्हणून त्यांची ओळख सदैव कायम राहील.”
– डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना नेत्या.





