Anantrao Thopte Passes Away : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Anantrao Thopte Passes Away : राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ आणि अनुभवी काँग्रेस नेते, माजी मंत्री तथा भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.

Anantrao Thopte Passes Away : राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ आणि अनुभवी काँग्रेस नेते, माजी मंत्री तथा भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अल्पशा आजाराने उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अनंतराव थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. ग्रामीण भागातील जनतेशी असलेला त्यांचा घट्ट संपर्क, विकासकामांबाबतची बांधिलकी आणि संघटन कौशल्य यामुळे ते लोकप्रिय लोकनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले असून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भूषविले होते.
हेही वाचा – महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचं सर्व चित्र झालं स्पष्ट; तब्बल ‘इतके’ उमेदवार बिनविरोध
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. पक्षनिष्ठा, संयमी नेतृत्व आणि सर्वसमावेशक राजकारण यासाठी त्यांचा राजकीय वर्तुळात विशेष आदर होता.
अनंतराव थोपटे हे माजी आमदार तथा भाजप नेते संग्राम थोपटे यांचे वडील होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध पक्षांतील नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
6 वेळा आमदार आणि 14 वर्षे मंत्रिपद –
भोर तालुक्याच्या राजकारणात मोठे प्रस्थ असलेल्या थोपटे घराण्याचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी सलग 6 वेळा आमदारकी आणि तब्बल 14 वर्षे मंत्रिपद भूषवत या मतदारसंघाचे प्रदीर्घ काळ यशस्वी नेतृत्व केले. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या अनंतरावांच्या शब्दाला काँग्रेस पक्षामध्येही मोठा मान होता.
1983 साली पहिल्यांदा राज्यमंत्रिपदाची जबाबदारी –
पुण्यात काँग्रेस पक्ष तळागाळात रुजवून त्याची ताकद वाढवण्यात अनंतराव थोपटे यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले असून, त्यांच्या या निधनाने काँग्रेस वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, 1983 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी सोपवली होती.
महत्त्वाचे खाते यशस्वीपणे सांभाळली –
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनंतराव थोपटे यांनी उच्च व तंत्रशिक्षण, मदत व पुनर्वसन, परिवहन, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार हमी योजना, मत्स्यव्यवसाय आणि फलोत्पादन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. या शासकीय जबाबदाऱ्यांसोबतच, त्यांनी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणूनही उल्लेखनीय कामकाज पाहिले होते.




