सर्वोच्च न्यायालयाचा लॉटरी किंगला दिलासा; मनी लॉण्डरिंग प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती

नवी दिल्ली -लॉटरी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सँटियागो मार्टीनला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्याच्या विरोधात सुरू असलेल्या मनी लॉण्डरिंग प्रकरणाच्या सुनावणीला न्यायालयाने स्थगिती दिली. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना सर्वांधिक निधी दिल्यामुळे मार्टीनचे नाव चर्चेत आले.
लॉटरी घोटाळ्यावरून मार्टीन केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आला. सर्वप्रथम सीबीआयने त्याच्या विरोधात २०१४ यावर्षी गुन्हा नोंदवला. त्यानंतर सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन ईडीने २०१८ मध्ये मार्टीन विरोधात मनी लॉण्डरिंगची तक्रार नोंदवली. पुढील वर्षीच्या (२०१९) सप्टेंबरमध्ये मार्टीनने सीबीआयच्या प्रकरणात मुक्तता मिळावी यासाठी याचिका दाखल केली.
ती अद्याप प्रलंबित आहे. त्यानंतर मार्टीनने केरळमधील विशेष न्यायालयात नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वतंत्र याचिका दाखल केली. सीबीआयचे प्रकरण निकाली निघेपर्यंत मनी लॉण्डरिंग प्रकरणाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी त्या याचिकेतून करण्यात आली. मात्र, विशेष न्यायालयाने मागील महिन्यात ती याचिका फेटाळली. त्यामुळे मार्टीनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
मुख्य प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच मनी लॉण्डरिंग प्रकरणाची सुनावणी सुरू व्हायला हवी होती, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांकडून करण्यात आला होता. निवडणूक रोख्यांमुळे मार्टीन मोठ्या चर्चेचा विषय बनला. त्याच्या मालकीच्या फ्युचर गेमिंग ॲंड हॉटेल सर्व्हिसेस या कंपनीने सर्वांधिक १ हजार ३६८ कोटी रूपयांच्या रोख्यांची खरेदी केली होती.





