Suryakumar Yadav Statement : ‘आम्ही कोलंबोला जातोय, आमची फ्लाईट बुक आहे!’ पाकिस्तानच्या बहिष्कारावर सूर्याचे रोखठोक उत्तर
Suryakumar Yadav statement : सूर्या म्हणाला, "आमची फ्लाईट आधीच बुक झाली आहे. आम्हाला १५ फेब्रुवारीचा सामना खेळायला सांगण्यात आले आहे आणि आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत."

Suryakumar Yadav statement on IND vs PAK match : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या मोहिमेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘कॅप्टन्स प्रेस कॉन्फरन्स’मध्ये भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत निर्माण झालेल्या वादावर भारताची भूमिका स्पष्ट केली. “आमचा विचार एकदम स्पष्ट आहे; आम्ही पाकिस्तानसोबत खेळायला कधीच नकार दिला नाही, त्यांनीच दिला आहे,” अशा शब्दांत सूर्याने पाकिस्तानला आरसा दाखवला.
“त्यांच्या निर्णयावर आमचे नियंत्रण नाही” –
१५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तान सरकारने बहिष्कार टाकला आहे. यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सूर्या म्हणाला, “त्यांच्या निर्णयाशी आमचा काहीही संबंध नाही. आमच्या सामन्यांचे वेळापत्रक ठरलेले आहे. आम्ही आधी युएसए (USA), नंतर नामिबिया आणि त्यानंतर कोलंबोला जाणार आहोत. आमची फ्लाईट आधीच बुक झाली आहे. आम्हाला १५ फेब्रुवारीचा सामना खेळायला सांगण्यात आले आहे आणि आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.”
ड्रेसिंग रूमचे वातावरण आणि खेळाडूंचे स्वातंत्र्य –
सूर्याने भारतीय संघाच्या सध्याच्या फॉर्मवरही भाष्य केले. तो म्हणाला, “आमच्या संघात वैयक्तिक रेकॉर्डपेक्षा टीमच्या गरजेला जास्त महत्त्व दिले जाते. आम्ही ड्रेसिंग रूमचे वातावरण हलके ठेवतो. इशान किशनने सराव सामन्यात ९० धावांवर असतानाही षटकार मारून शतक पूर्ण केले, हे खेळाडूंना दिलेल्या स्वातंत्र्याचेच लक्षण आहे. मैदानातील खेळाडूंना त्यांच्या शैलीनुसार खेळण्याची पूर्ण मुभा असते.”
SKY DROPS A BOMBSHELL! 💣🔥
“We never refused to play Pakistan — they did.”
Suryakumar Yadav clears the air on the IND vs PAK boycott. Team focused, and ready to fly. First stop: USA & Canada. Final destination: Colombo! ✈️🏏#SuryakumarYadav #INDvsPAK #T20WorldCup2026 #t20 pic.twitter.com/AVRSwXmcap— sports__life (@statecraft__) February 5, 2026
बीसीसीआयची भूमिका: ‘आयसीसी’कडे चेंडू –
भारत-पाक सामन्यावर सूर्यकुमार यादव यांचे विधान
या वादावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणावर आम्हाला काहीही बोलायचे नाही. हा संपूर्ण निर्णय आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) घेईल. आयसीसी जो आदेश देईल, त्यानुसार आम्ही पुढे जाऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानला बसणार आर्थिक फटका?
पाकिस्तानचा संघ श्रीलंकेत पोहोचला असून त्यांना त्यांचे सर्व लीग सामने कोलंबोमध्येच खेळायचे आहेत. जर पाकिस्तानने १५ फेब्रुवारीच्या सामन्यावर बहिष्कार टाकला, तर आयसीसी त्यांच्यावर मोठा दंड आकारण्याची शक्यता आहे. पाकिस्तान सरकारने हा आदेश दिल्याचे म्हटले जात असले तरी, अद्याप पीसीबीने (PCB) याबाबत कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.





