Jacqueline Fernandez : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची माघार; जॅकलिन फर्नांडिसच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?
न्या. मिश्रा यांनी खंडपीठातून माघार घेतल्यामुळे, आता हे प्रकरण २५ जून रोजी त्यांच्या समावेशाशिवाय असलेल्या खंडपीठासमोर सूचीबद्ध केले जाईल.

Jacqueline Fernandez – किमान २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आपल्यावर आरोप निश्चित करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या याचिकेवरील सुनावणीतून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा यांनी गुरुवारी माघार घेतली.
न्या. मिश्रा आणि न्या. अतुल एस. चंडुरकर यांच्या खंडपीठाने अभिनेत्रीचे वकील आणि अंमलबजावणी संचालनालयाला सांगितले की, हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे पाठवले जाईल.
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तेव्हा न्या. मिश्रा यांनी सांगितले की, ते या प्रकरणाची सुनावणी करू शकत नाहीत कारण त्यांचा मुलगा आदित्य मिश्रा या प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात सरकारी बाजूने उपस्थित राहिला होता.
संबंधित प्रकरणांपैकी एका प्रकरणात माझा मुलगा सरकारी बाजूने उपस्थित राहिला होता. हे प्रकरण २५ जून रोजी अशा खंडपीठासमोर ठेवा ज्यामध्ये आमच्यापैकी कोणीही सदस्य नसेल, असे सांगत न्यायमूर्ती मिश्रा यांनी सुनावणीतून माघार घेतली.
न्या. मिश्रा यांनी खंडपीठातून माघार घेतल्यामुळे, आता हे प्रकरण २५ जून रोजी त्यांच्या समावेशाशिवाय असलेल्या खंडपीठासमोर सूचीबद्ध केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाची नोंदणी शाखा (रजिस्ट्री) योग्य खंडपीठाकडे हे प्रकरण सोपवण्यासाठी सरन्यायाधीशांसमोर ते सादर करेल.






