Sonam Wangchuk – लेहच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यामधून पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्याचे जोरदार समर्थन करण्यात आले. लडाखमधील आंदोलनाला २४ सप्टेंबर यादिवशी हिंसक वळण मिळाले. त्यावेळी लेहमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. त्यामध्ये ४ आंदोलक मृत्युमुखी पडले. त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या वांगचुक यांना २६ सप्टेंबरला अटक करण्यात आली. कठोर स्वरूपाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातील (रासुका) तरतुदींतर्गत ती कारवाई करण्यात आली. संबंधित कारवाई अवैध नसल्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्रातून मांडली. सुरक्षा, सार्वजनिक व्यवस्था आणि अत्यावश्यक सेवांना अपायकारक ठरणाऱ्या कृतींमध्ये सामील असल्याबद्दल वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले, असे त्यांनी नमूद केले. वांगचुक यांना रासुका अंतर्गत ताब्यात घेण्याला त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी आव्हान दिले आहे. गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. वांगचुक यांना राजस्थानच्या जोधपूरमधील तुरूंगात ठेवण्यात आले आहे. त्या तुरूंगाच्या अधीक्षकांनीही न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. वांगचुक यांना एकाकी कोठडीत ठेवण्यात आलेले नाही. ते शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त आहेत. इतरांना भेटण्याचीही त्यांना परवानगी आहे, असे तुरूंग अधीक्षकांनी स्पष्ट केले. दरम्यान, वांगचुक यांची तातडीने सुटका करण्याची मागणी गीतांजली यांनी केली आहे. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी अपेक्षित होती. मात्र, गीतांजली यांचे वकील कपिल सिब्बल यांच्या विनंतीवरून ती सुनावणी स्थगित करून उद्या (बुधवार) घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले. त्या सुनावणीविषयी आता उत्सुकता असेल.