Sunil Tatkare : पक्षाच्या प्रवक्तांनी वक्तव्य जपून करावे; सुनील तटकरे यांचा अमोल मिटकरींना सल्ला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना अलीकडेच प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या ‘पांडुरंगाच्या इच्छेने एकत्र येऊ’ या विधानामुळे गती मिळाली होती. पण हे विधान पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून फारसे पचनी न पडल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी थेट इशारा देत मिटकरींना बोलताना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे.
तटकरे म्हटले की, अमोल मिटकरींना सल्ला आहे की त्यांनी वक्तव्य जपून करावे. ते पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे पक्षाची भूमिका एकदा मांडल्यानंतर पुन्हा त्यावर बोलण्याची गरज नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. आम्ही राज्यात महायुतीत आहोत. देशात एनडीएत आहोत. हा आमचा ठाम निर्णय आहे आणि त्यात जराही बदल होणार नाही. कोणाला यायचं असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा, पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सामूहिक निर्णय, एकमताने वाटचाल
एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय कुणा एकट्याने घेतलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आणि मी – आम्हा सगळ्यांनी मिळून एकमताने हा निर्णय घेतला. राज्यातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, असे तटकरे म्हणाले.





