Sunil Narine backs Umran Malik as KKR’s new X-factor : कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार फिरकीपटू सुनील नरेनने आगामी आयपीएल हंगामाबद्दल मोठे विधान केले आहे. आंद्रे रसेलने निवृत्ती घेतल्यामुळे मैदानावरील त्याची पॉवर हिटिंगची उणीव संघाला निश्चितच जाणवेल, पण उमरान मलिक त्याच्या १५० किमी प्रतितास वेगाच्या गोलंदाजीमुळे संघासाठी ‘एक्स फॅक्टर’ ठरू शकतो, असे मत नरेनने व्यक्त केले आहे. मागील सत्रात दुखापतीमुळे बाहेर असलेला वेगवान गोलंदाज उमरान मलिक कूल्हेच्या दुखापतीतून सावरत केकेआरकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. जम्मू-काश्मीरचा हा वेगवान गोलंदाज फ्रँचायझीसाठी पुढील ‘तुरूपचा एक्का’ बनण्याची क्षमता ठेवतो, असे नरेनला वाटते. ‘उमरान ठरु शकतो एक्स फॅक्टर’ – पीटीआयशी बोलताना सुनील नरेन म्हणाला, “उमरान एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये छोटी मैदाने आणि चांगल्या खेळपट्ट्या असल्यामुळे तुम्हाला वेगवान गोलंदाजीसाठी एक्स फॅक्टरची गरज असते. मला वाटते की उमरान खूप चांगली कामगिरी करेल. त्यामुळे तो केकेआरसाठी एक्स फॅक्टर ठरु शकतो. हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : नाद करा पण वैभवचा कुठं! विराट-रोहितलाही मागे टाकत ठरला २०२५ चा ‘गूगल किंग’ जवळपास १८ महिन्यांपेक्षा जास्त काळ मैदानापासून दूर राहिल्यानंतर उमरानने या देशांतर्गत हंगामात पुनरागमन केले. त्याने जम्मू-काश्मीरसाठी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पाच विकेट घेत लगेचच लय पकडली. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्याने ३७ धावांत तीन विकेट्स घेत, आपल्या गती आणि उसळीने केकेआरमधील सहकारी रिंकू सिंगसह अनेक फलंदाजांना त्रास दिला होता. सनरायझर्स हैदराबादने रिलीज केल्यानंतर केकेआरने उमरानला ७५ लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात घेतले होते. नरेन म्हणाला, “तो तंदुरुस्त राहील अशी आशा आहे. मी त्याला १४५-१५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.” हेही वाचा – Fakhar Zaman : पाकिस्तानच्या खेळाडूला पंचांशी पंगा घेणं पडलं महागात! ICC ने केली मोठी कारवाई आंद्रे रसेलची उणीव जाणवणार – सुनील नरेनने मान्य केले की, आंद्रे रसेलने नुकतीच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे संघाला त्याची उणीव भासेल. निश्चितच, आम्हाला मैदानावर ड्रेर्स (रसेल) ची कमतरता जाणवेल. एकदा तो फलंदाजीसाठी क्रीझवर आला की, कितीही मोठे लक्ष्य असले तरी ते गाठण्याची शक्यता कायम राहते. त्याची जागा भरणे हे एक आव्हान असेल,” असे नरेन म्हणाला.