पिंपरी | दिघीतील युवा उद्योजक सुनील काकडे उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित

चऱ्होली, (प्रतिनिधी) – दिघी येथील, रहिवाशी युवा उद्योजक सुनील काकडे यांना राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत व खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पिंपरी चिंचवड मधील रावेत येथे झालेल्या भूम, परांडा वाशी तालुक्यातील उद्योजकांच्या मेळाव्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
युवा उद्योजक सुनील काकडे हे परंडा तालुक्यातील दहिटणे गावचे रहिवाशी असून, ते अनेक वर्षापासून दिघी उपनगरामध्ये कामानिमित्त पुण्यामध्ये स्थायिक झाले आहेत ते सध्या पिंपरी चिंचवड लघु उद्योजक विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
सुनील काकडे यांनी छोटे-मोठे व्यावसायिक एकत्रित करून उत्कृष्ट संघटन केले आहे. या संघटनाच्या माध्यमातून व्यवसायांच्या देवाण-घेवाणी बरोबरच विचारांची देवाण-घेवाण आणि व्यवसायासाठी लागणारी मदत यातून त्यांचे कार्य आहे. मराठवाड्यातील सर्व उद्योजक एका छताखाली आणून त्यांनी संघटनात्मक कार्य केले आहे.
सुनिल काकडे स्वाभिमानी मराठवाडा विचारमंचाचे संस्थापक, दिघी मधील दिघी विकास मंचाचे ते प्रमुख आहेत. त्यांचा संपर्क अनेक सामाजिक, कला, साहित्यिक, सांप्रदायिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनेबरोबर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांबरोबर त्यांनी उत्तम नाते जपले आहे.
अष्टपैलू व्यक्ितमत्व असलेल्या सुनील काकडे यांच्या कार्याची दखल घेऊन ग्रामीण भागातला एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.





