Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची ईसीबीवर टीका! अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी समाप्तीनंतर उपस्थित केला मोठा मुद्दा

Sunil Gavaskar raise question on ECB : भारताचा इंग्लंड दौरा नुकताच संपला असून, यावेळी खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली. या मालिकेनंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ऐतिहासिक ‘पतौडी ट्रॉफी’ ऐवजी नवीन ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’ आणण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे.
सुनील गावस्करांनी कॉलममध्ये काय लिहिले?
ईसीबीने ‘पटौदी ट्रॉफी’ला बाजूला सारून विजेत्या कर्णधाराला ‘पटौदी पदक’ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयावर चाहते आणि तज्ज्ञांनी जोरदार टीका केली आहे. यावर गावस्कर यांनीही ईसीबीच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. स्पोर्टस्टारसाठी लिहिलेल्या आपल्या कॉलममध्ये सुनील गावस्कर यांनी सांगितले की, पदक वितरण समारंभात पटौदी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. त्यांनी हे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. मालिका बरोबरीत सुटल्याने ‘पटौदी ट्रॉफी’ हटवणे आणि त्याऐवजी बदल्याच्या भावनेने हा निर्णय घेणे मूर्खपणाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमी कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक करु शकेल का? बीसीसीआयने दिली मोठी अपडेट
सचिन-अँडरसन यांच्या अनुपस्थितीवरही टीका –
गावस्कर यांनी पुढे लिहिले, “जेव्हा मालिका बरोबरीत सुटते, तेव्हा विजेता नसतो, त्यामुळे पदकही देता येत नाही. मग मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूला हे पदक देणे अधिक योग्य ठरले नसते का? आणि जर कर्णधाराची कामगिरी सामान्य असेल आणि सामन्यावर त्याचा विशेष प्रभाव पडला नसेल, तर त्याला हे पदक का द्यावे?”सुनील गावस्करांनी नवीन ट्रॉफीच्या नावावरूनही प्रश्न उपस्थित केले.
सचिन-अँडरसन यांच्या अनुपस्थितीवरही टीका –
या मालिकेचे नाव क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. मात्र, हे दोन्ही खेळाडू इंग्लंडमध्ये असूनही समारंभाला उपस्थित नव्हते, यावर गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “प्रथमच मालिकेचे नाव सचिन आणि अँडरसन यांच्या नावावर ठेवण्यात आले. त्यामुळे अपेक्षा होती की, हे दोघे समारंभाला उपस्थित राहून विजेत्या कर्णधाराला ट्रॉफी देतील, विशेषतः जेव्हा मालिका बरोबरीत सुटली आहे.”
सुनील गावस्कर यांनी प्रश्न उपस्थित करताना म्हटले, “त्यांना समारंभाला बोलावलेच गेले नाही का? की यंदाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात जे घडले तसेच काही झाले? तिथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी देण्यासाठी फक्त अॅलन बॉर्डर यांनाच बोलावले गेले, कारण ऑस्ट्रेलिया जिंकला होता. मालिका बरोबरीत सुटल्याने यावेळी कुणालाच बोलावले गेले नाही का?” या वादामुळे क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.





