Sunil Gavaskar : ‘KKR च्या जेतेपदाचा खरा हक्कदार श्रेयस होता, पण…’, गावस्करांनी गंभीरवर साधला निशाणा

Sunil Gavaskar highlights Shreyas Iyer’s pivotal role : आयपीएल २०२५ मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. यानंतर सुनील गावस्करांनी नाव न घेता गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे. गावस्कर म्हणाले की, केकेआरच्या यशाचे खरा हक्कदार श्रेयस अय्यर असताना, त्याचे सर्व श्रेय गौतम गंभीरला देण्यात आले. गंभीर हंगामाच्या सुरुवातीला केकेआरमध्ये मार्गदर्शक म्हणून आला होता, परंतु आयपीएल जेतेपद जिंकल्यानंतर सर्व कौतुक गंभीरलाच मिळाले, तर श्रेयसचे योगदान दुर्लक्षित राहिले.
सर्व श्रेय दुसऱ्याला दिले –
सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, “गेल्या हंगामात आयपीएलचे जेतेपद जिंकण्याचे श्रेय श्रेयस अय्यरला मिळाले नाही. सर्व श्रेय दुसऱ्याला देण्यात आले. हे लक्षात घ्यायला हवं होतं की सामन्यात कर्णधाराची भूमिका महत्त्वाची असते. डगआउटमध्ये बसून कोणीही तुम्हाला जिंकवू शकत नाही. या वर्षी पहा, अय्यरला सर्व श्रेय मिळत आहे. रिकी पॉन्टिंगने पंजाबला विजय मिळवून दिला असे कोणीही म्हणत नाही.”
𝘚𝘩𝘳𝘦𝘺𝘢𝘴 𝘐𝘺𝘦𝘳 𝘩𝘢𝘴 𝘢𝘭𝘸𝘢𝘺𝘴 𝘣𝘦𝘦𝘯 𝘵𝘩𝘪𝘴 𝘨𝘰𝘰𝘥. 𝘕𝘰𝘸 𝘵𝘩𝘦 𝘸𝘰𝘳𝘭𝘥 𝘪𝘴 𝘧𝘪𝘯𝘢𝘭𝘭𝘺 𝘯𝘰𝘵𝘪𝘤𝘪𝘯𝘨! #IPL2025 #ShreyasIyer #SunilGavaskar pic.twitter.com/8bjB8A3D21
— OneCricket (@OneCricketApp) May 19, 2025
श्रेयस असं करणारा एकमेव कर्णधार –
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब संघ ११ वर्षांत प्रथमच आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचला आहे हे उल्लेखनीय आहे. यासह, तो आयपीएलच्या इतिहासात तीन वेगवेगळ्या फ्रँचायझींच्या संघांना प्लेऑफमध्ये नेणारा एकमेव कर्णधार बनला आहे. यापैकी दोन घटना सलग घडल्या आहेत. आयपीएल २०२३ मध्ये अय्यरला पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले होते. यानंतर, २०२४ मध्ये, त्याने केकेआरचे नेतृत्व केले आणि त्यांना जेतेपद मिळवून दिले. मागील दोन हंगामात हा संघ सातव्या स्थानावर होता.
हेही वाचा – Shreyas Iyer : पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचवत श्रेयसने रचला इतिहास! रोहित-धोनीला जे जमलं नाही, ते करून दाखवलं
श्रेयस अय्यरने सोडली छाप –
या शानदार कामगिरीनंतरही, केकेआरने श्रेयसला कायम ठेवले नाही. यानंतर, मेगा लिलावात, पंजाब किंग्जने श्रेयसला २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. आता श्रेयसने त्याच्या चमकदार कामगिरीने पंजाब किंग्जने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवला आहे. आयपीएल २०२५ पूर्वी, अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी देखील उत्कृष्ट कामगिरी केली होती, जिथे तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. आयपीएलबद्दल बोलायचे तर, श्रेयसने १२ सामन्यांमध्ये १७४.७० च्या स्ट्राईक रेटने ४३५ धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचाही समावेश आहे.





