पुणे जिल्हा | सुनेत्रा पवारांना कॅबीनेट मंत्रीपद मिळणार

जेजुरी, (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी हे तिसर्यांदा पंतप्रधान होणार असून जायंट किलर म्हणून सुनेत्रा पवार यांना केंद्रात निश्चितपणे कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे पुरंदर-हवेलीचे निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांनी कोळविहीरे येथे गावभेट दौर्यात सांगितले.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या पुरंदर तालुक्यातील गाव भेट दौर्यात गर्दी होत आहे. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस, राजुरी, नायगाव, पिसर्वे, बेलसर, साकुर्डे, कोळविहीरे, राख, गुळुंचे व नीरा या गावातून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकार्यांचा गाव भेट दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, विजय शिवतारे, निलेश जगताप, जालिंदर कामठे, रमेश इंगळे, विराज काकडे, निलेश जगताप, विक्रम सस्ते, अॅड. दशरथ घोरपडे, मीना जाधव उपस्थित होते.
साकुर्डे येथे कल्याणराव जाधव व त्यांच्या कुटुबीयांनी सुनेत्रा पवार यांचे स्वागत केले. केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना त्यानिमित्ताने आपल्याला मिळणार आहेत. आपले प्रश्न सोडवण्यासाठी अधिकचा निधी निश्चितपणे आपल्याला मिळेल यासाठी सुनेत्रा पवार यांना दिल्लीला पाठवा, असेही आवाहन प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.





