Sunetra Pawar : वढू-तुळापूरचा कायापालट; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली २६९ कोटींच्या विकासकामांची पाहणी
Sunetra Pawar : छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त सुनेत्रा पवार यांनी तुळापूर येथे केले अभिवादन; स्थानिक गावकऱ्यांसोबत पदयात्रेत घेतला सहभाग.

Sunetra Pawar – स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्रीक्षेत्र तुळापूर येथील समाधीस्थळी जाऊन विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि स्थानिक गावकऱ्यांसोबत आयोजित मुकज्योत पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
याप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, प्रफुल्ल शिवले, मोनिका हरगुडे, पालखी सोहळा संस्थापक संदीप भोंडवे, अध्यक्ष सचिन पलांडे, पंचायत समिती सदस्य मोनिका कंद आणि राणी वाळके उपस्थित होते. तसेच प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आणि तुळापूरच्या प्रशासक सरपंच ॲड. गुंफा इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी संगमेश्वराचे दर्शनही घेतले.
स्मारकासाठी २६९ कोटींचा निधी
छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासासाठी शासनाने २६९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत वढू बुद्रुक आणि तुळापूर या दोन्ही समाधीस्थळी विकासकामे वेगाने सुरू आहेत. ही कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याप्रसंगी दिल्या.





