Sumona Chakravarti : मुंबईत मराठा आंदोलकांमुळे अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती अस्वस्थ; “गाडीत बसले तरी असुरक्षित वाटलं” म्हणत सोशल मीडियावर शेअर केला अनुभव…

Sumona Chakravarti : कपिल शर्मा शो मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनादरम्यानचा धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. दक्षिण मुंबईत दिवसाढवळ्या घडलेला हा प्रकार तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे आता चर्चेत आला आहे.
सुमोनाने लिहिले की, कुलाब्याहून फोर्टला जाताना आंदोलकांनी तिची गाडी दोन वेळा अडवली. दुपारी साडेबारा वाजता अचानक जमाव गाडीभोवती जमला. गळ्यात भगवा पंचा घातलेला एक माणूस थेट गाडीच्या बोनटवर चढला आणि कुत्सित हसत विचित्र हावभाव करू लागला. त्याचे साथीदार गाडीच्या खिडक्यांवर ठोठावत “जय महाराष्ट्र”च्या घोषणा देत होते. “५ मिनिटांत दोनदा हा प्रकार घडला, आणि मला माझ्याच गाडीत असुरक्षित वाटलं,” असं तिने पोस्टमध्ये नमूद केलं.
पुढे सुमोना म्हणाली की, आंदोलनाच्या नावाखाली काही लोक रस्त्यावर जेवत-झोपत आहेत, आंघोळ करत आहेत, रील्स बनवत आहेत आणि मुंबई दर्शन करत आहेत. “संपूर्ण सिव्हिक सेन्सची खिल्ली उडवली जात आहे. रस्ते घाणीने, प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचऱ्याने भरलेले आहेत,” असा आरोपही तिने केला.
View this post on Instagram
तिने प्रशासन आणि पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले. “पोलिस निवांत बसून गप्पा मारत होते. कायदा आणि सुव्यवस्था काही सेकंदांत कोसळू शकते हे प्रत्यक्ष जाणवलं. मी बरंच आयुष्य मुंबईत घालवलं आहे आणि नेहमी सुरक्षित वाटलं. पण आज पहिल्यांदाच, माझ्या स्वतःच्या गाडीत असूनही मला दिवसाढवळ्या असुरक्षित वाटलं,” असे सुमोनाने लिहिले.
तिने हेही नमूद केले की, व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा विचार आला होता, पण आंदोलक भडकू शकतात या भीतीने तिने तो निर्णय बदलला. “जर माझ्यासोबत मित्र नसता आणि मी एकटी असते तर काय झालं असतं, हा विचार मनात आला,” असे ती म्हणाली.
शेवटी सुमोनाने प्रशासनाला उद्देशून लिहिले की, “कर भरणारी नागरिक, एक महिला आणि मुंबईवर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून मी अस्वस्थ झाले आहे. आपल्याला आपल्या शहरात सुरक्षित वाटण्याचा हक्क आहे. आंदोलनं शांततेत होऊ शकतात, पण या अराजकतेला थारा देणं योग्य नाही.”





