Pune : सुखसागर नगरातील श्री अंबामाता मंदिराचा नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न
Pune : दररोज सुमारे १० हजार भाविकांनी घेतले देवीचे दर्शन; १५१ कन्यापूजनासह विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

Pune : सुखसागर नगर येथील श्री अंबामाता मंदिराचा नवरात्रोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. नऊ दिवसांच्या उत्सवादरम्यान दररोज सुमारे १० हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. विधिवत पूजा, महाआरती, भजन संध्या, गरबा-दांडिया, होम-हवन आणि १५१ कन्यापूजन असे विविध कार्यक्रम उत्सवाचे आकर्षण ठरले.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मंदिरात दररोज देवीची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. भजन संध्या तसेच गरबा-दांडियामुळे मंदिर परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. होम-हवन आणि १५१ कन्यापूजनाचा धार्मिक सोहळाही श्रद्धेने पार पडला. श्री यल्लमा देवीची मिरवणूकही उत्सवाचे विशेष आकर्षण ठरली.
नवरात्रोत्सवादरम्यान देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिराच्या विश्वस्त मंडळाने विविध नियमांचे पालन करत धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले. उत्सवाच्या काळात स्वच्छता आणि सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले.
नवरात्रोत्सव संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंदिर परिसरातील कमानी आणि फलक काढण्यात आले. त्यानंतर परिसराची स्वच्छता करण्यात आली. धार्मिक कार्यक्रमांसोबतच स्वच्छतेची जबाबदारीही विश्वस्त मंडळाने तत्परतेने पार पाडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा, स्वच्छता आणि सुरक्षितता यांचा समन्वय साधत श्री अंबामाता मंदिराचा नवरात्रोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. उत्सवासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व भाविक, सेवेकरी आणि संबंधितांचे विश्वस्त मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त मगराज राठी यांनी दिली.





