Aparna Gokhale : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री अपर्णा गोखले दिसणार नव्या भूमिकेत

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’. या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. गेल्या साडे चार वर्षांपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं. याच मालिकेतील आता एक अभिनेत्री नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील अभिनेत्री अपर्णा गोखले लवकरच नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अपर्णा गोखलेने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत रेणुका शिर्केची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. पण, आता मालिकेने प्रेक्षकांच्या निरोप घेतल्यानंतर अपर्णा वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत ती झळकणार आहे.
अपर्णा गोखलेने काय लिहिले पोस्टमध्ये?
“गेली साडे चार वर्षे रसिकांच्या मनावर आधिराज्य करणारी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने रविवारी निरोप घेतला. ज्याचा शेवट गोड, ते सगळे गोड. वाईटाचा नाश झाला, सत्याचा विजय झाला. हे सुख शोधत असतानाच मला ‘माझी माणसं’ मिळाली. दोन-अडीच वर्षे ‘सन मराठी’वर ही मालिका गाजत होती. सुख म्हणजे शोधताना मला माझी माणसं मिळाली, नवीन नाती जोडली गेली.
आयुष्यभरासाठी, हक्काची म्हणता येतील अशी माणसं भेटली आणि बघता बघता मला ‘सुखाची सावली’ देऊन गेली. रेणुका वर जेवढे प्रेम केलं, मीना ला जसं आपलंस केलं, तसंच प्रेम आता आसावरीवर सुद्धा करा. पुढच्या नवीन प्रवासात पण अशीच साथ द्या, आशीर्वाद असूद्या, प्रेम असूद्या. पाहत राहा माझी नवी मालिका ‘सावली होईन सुखाची’ ‘सन मराठी’वर दरारोज रात्री ९ वाजता.” असे अपर्णाने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.





