Suicide Case: “तुझ्याशी लग्न करणार नाही कारण…” प्रियकराच्या एका नकारामुळे २२ वर्षांच्या तरुणीचा करुण अंत
Suicide Case: प्रेयसीने विचारणा करताच प्रियकराने फिरवली पाठ; नैराश्यातून २२ वर्षीय मोनिकाने ओढणीच्या सहाय्याने घेतली गळफास.

Suicide Case – लग्नास नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून प्रेयसीने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने छताच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. खेड तालुक्यातील खालुंब्रे येथील तुळवे वस्तीतील एका भाड्याच्या खोलीत हा प्रकार घडला. मोनिका रामदास पवार (वय २२, रा. चंद्रकांत तुळवे यांची खोली, तुळवे वस्ती, खालुंब्रे, ता. खेड, मूळ रा. खांडके, जि. अहिल्यानगर), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
तिची आई रोहिणी रामदास पवार यांनी याप्रकरणी उत्तर महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रोहिणी यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, महाळुंगे पोलिसांनी साहिल शंकर बोत्रे (वय २३, रा. येलवाडी, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मोनिका ही तिच्या आई-वडिलांसमवेत खालुंब्रे येथे तुळवे यांच्या भाड्याच्या खोलीत गेल्या वीस वर्षांपासून राहत होते. दरम्यानच्या काळात मोनिका व साहिल यांच्यामध्ये सूत जुळल्याने प्रेमसंबंध निर्माण झाले.
साहिल याने मोनिका हिला लग्नाचे आमिष दाखवून लग्न न करता तो दुसऱ्या एका मुलीबरोबर चॅटिंग करीत असल्याचे तिला समजले. मोनिका हिने याबाबत साहिल याला विचारणा केली असता त्याने सांगितले की, ती माझी मैत्रीण आहे. म्हणून मी तिच्याशी चॅटिंग करत आहे. मी तुझ्याशी लग्न करणार नाही, आपल्या दोघांच्या लग्नाला माझ्या घरच्यांचा तीव्र विरोध आहे. यातून आलेल्या नैराश्यातून मोनिका हिने घरी आत्महत्या केली. याप्रकरणी तिचा प्रियकर साहिल बोत्रे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास करत आहेत.





