Nagar News| जिल्ह्यातील कारखान्यांच्या बरोबरीने उसाला बाजारभाव देणार

श्रीगोंदा, : चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला जिल्ह्यातील कारखान्यांच्या बरोबरीने बाजारभाव देणार असल्याची ग्वाही शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. गुरुवारीनागवडे कारखान्याचा ५०वा अग्निप्रदिपन व गव्हाणपूजन समारंभ संपन्न झाला.
कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नागवडे म्हणाले, गेल्या हंगामात अनेक ऊसतोडणी टोळ्या फसल्या, त्यामुळे अडचण आली. यावेळी त्याबाबत खबरदारी घेतली आहे. त्याचबरोबर ऊसतोडणी यंत्र उपलब्ध केले आहेत. खासगी कारखान्यांच्या गाळप क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते कारखाने कमी दिवसात जास्त गाळप करीत आहेत. परिणामी, अधिकचा भाव देणे त्यांना शक्य होत आहे. इतर कारखान्यांच्या बरोबरीने पैसे मिळण्याची सर्वांना अपेक्षा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी जास्तीत-जास्त ऊस आपल्या कारखान्याला दिला पाहिजे.
बाबासाहेब भोस म्हणाले, सहकारी कारखानदारीत राजकारण सुरू झाले तर कारखानदारी मोडीत निघेल. त्यामुळे कारखानदारी वाचवण्यासाठी राजकारण विरहित भूमिका घेण्याची अपेक्षा आहे. जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, जीवन शिपलकर, डी.आर. काकडे, विठ्ठल जंगले, प्रा. सुरेश रसाळ, विजय मुथा, भाऊसाहेब नेटके, सावता हिरवे, बंडू जगताप, रमजान हवालदार, भाऊसाहेब बरकडे, मधुकर शेलार, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते. सुभाष शिंदे यांनी प्रास्ताविक केले. शरद जगताप यांनी आभार मानले.





