नेवासा : सहकार चळवळीतील साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करत असल्याचा आरोप करत शेतकरी संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखान्यांच्या वजन काट्यांवर घोटाळे होत असल्याच्या तक्रारींवरून शेतकरी संघटनांनी ऊस उत्पादकांना आता स्वतःच्या ऊसाचे वजन प्रथम दुसऱ्या काट्यावर करून घेण्याचा आणि कारखान्याच्या काट्यावर तफावत आढळल्यास ऊस गाड्या माघारी वळवून दुसऱ्या कारखान्यात नेण्याचा सल्ला दिला आहे. या आक्रमक भूमिकेमुळे साखर कारखानदारांचे धाबे दणाणले असून, शेतकऱ्यांच्या जनजागृतीसाठी शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना साखर कारखान्यांच्या काटामारीवर प्रथमच उघडपणे भाष्य करत खरपूस समाचार घेतला. त्यांच्या या वक्तव्यानंतर साखर कारखान्यांच्या वजन काट्यांवरील घोटाळ्यांमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शेतकरी संघटनांना बळ मिळाले असून, त्यांनी कारखानदारांच्या ‘मापात पाप’ करण्याच्या भूमिकेवर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचे घामाचे दाम आणि मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी शेतकरी संघटना आता अधिक आक्रमकपणे पावले उचलत आहेत. शेतकरी संघटनांनी ऊस उत्पादकांना सल्ला दिला आहे की, त्यांनी आपला ऊस प्रथम दुसऱ्या विश्वासार्ह वजन काट्यावर मोजावा. जर साखर कारखान्याच्या काट्यावर वजनात तफावत आढळल्यास, त्या ऊस गाड्या तात्काळ माघारी वळवून दुसऱ्या कारखान्यात घालाव्यात. यामुळे कारखानदारांच्या काटामारीला आळा बसेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळेल, असा विश्वास संघटनांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, ज्या कारखान्यांमध्ये काटामारी उघड होईल, त्या कारखान्यांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ‘बोंबाबोंब’ आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहमदनगर दौऱ्यात साखर कारखानदारांच्या काटामारीवर लक्ष वेधल्याने शेतकरी संघटनांना मोठा आधार मिळाला आहे. यामुळे शेतकरी आता आपला स्वाभिमान जपत कारखानदारांना धडा शिकवण्यासाठी एकवटले आहेत. शेतकरी संघटना ‘दामापेक्षा मापाचे बोला’ असा संदेश देत जनजागृती मोहीम राबवत असून, यामुळे साखर कारखानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. शेतकरी आता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागवण्यासाठी संघटनांचा आक्रमक पवित्रा जर साखर कारखानदारांचा कारभार प्रामाणिक असेल, तर त्यांना दुसऱ्या काट्यावर वजन करण्यास हरकत नसावी. मात्र, जर कारखान्याच्या काट्यावर तफावत आढळली, तर शेतकऱ्यांनी ऊस गाड्या माघारी वळवून दुसऱ्या कारखान्यात नेण्याचा सल्ला शेतकरी संघटनांनी दिला आहे. या आक्रमक भूमिकेमुळे साखर कारखान्यांचे धुराडे पेटले असले, तरी शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवणाऱ्या कारखानदारांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. शेतकरी संघटनांच्या जनजागृतीमुळे शेतकरी कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.