सातारा | ‘किसन वीर’वर उद्या ऊस पीक कार्यशाळा

भुईंज – येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सोमवारी (दि. 10) सकाळी 9 वाजता ‘बदलत्या हवामानात पर्यावरणपूरक खोडवा उसाचे शाश्वत व विक्रमी उत्पादन’ या विषयावर शेतकर्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, सतत बदलणार्या हवामानाचा परिणाम शेतीवर होतो. त्यानुसार शेतकर्यांनीही आपल्या शेतामध्ये बदल करणे गरजेचे आहे. यासाठी किसन वीर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर ऊस पीक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत पुणे कृषी महाविद्यालयातील माती व पाणी चिकित्सालयाचे व्यवस्थापक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील ऊस रोग शास्त्रज्ञ डॉ. सूरज नलवडे, पुणे कृषी महाविद्यालयाच्या कृषी अर्थशास्त्रच्या प्रा. डॉ. ताई देवकाते मार्गदर्शन करणार आहेत. कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील अध्यक्षस्थान भूषविणार असून जिल्हा बँकेचे चेअरमन व कारखान्याचे संचालक नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यशाळेस किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे व कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे.





