साखर महागणार; उत्पादन खर्च वाढल्याचा परिणाम

नवी दिल्ली – साखर उत्पादन करणार्या कारखान्यांनी साखरेचा किमान आधारभूत दर वाढवावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली आहे. आता केंद्र सरकारने याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल असे सुचित केले आहे. जर साखरेचा किमान आधारभूत दर वाढला तर ग्राहकांना महाग साखर खरेदी करावी लागेल. साखरेचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे साखरेच्या दरात वाढ करावी लागणार असल्याचे दिसून येते.
यासंदर्भात केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, साखर कारखान्यांच्या संघटनांनी अनेक वेळा साखरेची किंमत वाढवून मिळावी यासाठी सरकारकडे निवेदन दिले आहे. या विषयावर सरकारमध्ये अनेक पातळ्यावर चर्चा चालू आहे. या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
साखरेचा किमान आधारभूत दर फेब्रुवारी 2019 मध्ये ठरविण्यात आला होता. हा दर 2019 पासून 31 रुपये प्रति किलो या पातळीवर आहे. दरम्यानच्या काळामध्ये सरकारने उसाच्या आधारभूत दरात वाढ केली आहे. साखर कारखान्यांना शेतकर्यांना वाढीव दराने पैसे द्यावे लागत आहेत, मात्र साखर कारखान्यांना 31 रुपयापेक्षा जास्त दराने साखर विकता येत नाही, दरम्यानच्या काळात महागाईमुळे साखरेचा उत्पादन खर्च वाढला आहे, असे साखर कारखान्यांनी वेळोवेळी सांगितले आहे.
साखर कारखान्यांना एकिकडे शेतकर्यांना जास्त पैसे द्यावे लागत असतानाच देशातील ग्राहकांना कमी दराने साखर विकावी लागत आहे. अशा परिस्थितीत साखर कारखान्यांच्या ताळेबंदावर परिणाम झाला आहे. जर साखरेचा दर वाढवून मिळाला नाही तर साखर कारखान्यावर मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती साखर कारखान्यांच्या संघटनांनी व्यक्त केले होती.
साखर कारखान्यांनी वेळोवेळी साखरेचा दर वाढविण्याची मागणी केलेली आहे. हा विषय सरकारच्या ध्यानात आलाआहे. यावर चर्चा चालू आहे. साखरेचा किमान दर वाढवायचा की नाही आणि वाढवला तर किती वाढवायचा या संदर्भात सरकार निर्णय घेईल असे जोशी यांनी सांगितले.
साखर कारखान्यांना किती दर हवा –
सध्याची परिस्थिती पाहता साखरेला किमान भाव 39 रुपये 14 पैसे ते 42 रुपये प्रति किलो मिळण्याची आवश्यकता आहे, असे साखर कारखानदारांच्या संघटनेने सरकारला सांगितले आहे. इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेने सरकारला या संदर्भात निवेदन दिले आहे. जर साखरेचा दर वाढवून दिला तर ग्राहकांना साखरेसाठी अधिक दर द्यावा लागेल.





