वाहन कंपन्याकडून दरवाढ; उत्पादन खर्च वाढत असल्याचा परिणाम

नवी दिल्ली – रुपयाचा दर कोसळल्यामुळे आयात महागत पडत आहे. त्याचबरोबर एकूणच महागाई जास्त असल्यामुळे कच्च्या मालाच्या किमती जास्त आहेत. अशा परिस्थितीत काही वाहन कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली आहे.
मारुती सुझुकी कंपनीने आपल्या विविध वाहनाच्या दरात 4.5 टक्क्यापर्यंत वाढ करण्यात येईल असे सांगितले आहे. एप्रिल महिन्यापासून ही दरवाढ लागू होईल. कंपनीने शेअर बाजारांना कळविलेल्या माहितीत म्हटले आहे की, कच्च्या मालाच्या किमती बरोबरच उत्पादनाचा खर्च वाढत असल्यामुळे ही दरवाढ करावी लागत आहे. ही दरवाढ कमीत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या अगोदर जानेवारी महिन्यात या कंपनीने आपल्या विविध वाहनांच्या किमती 32,500 रुपयांपर्यंत वाढविल्या होत्या. त्यानंतर लगेच एप्रिल महिन्यापासून दरवाढ करण्यात येत आहे. आज या कंपनीच्या शेअरचा भाव 0.61 टक्क्यांनी वाढून 11,578 रुपये 50 पैसे प्रति शेअर या पातळीवर गेला होता.
टाटा मोटर्स –
टाटा मोटर्स कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या दरात एप्रिल महिन्यापासून दोन टक्के वाढ होणार असल्याचे शेअर बाजारांना कळविले आहे. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करावी लागत आहे. विविध वाहनांच्या दरात वेगवेगळी वाढ असेल. 165 अब्ज डॉलरच्या टाटा समूहातील टाटा मोटर्स ही कंपनी 44 अब्ज डॉलरच्या बाजार मूल्याची आहे. ही कंपनी कार, ट्रक, बसेसचे उत्पादन करते. या घटनाक्रमानंतर कंपनीच्या शेअरचा भाव 0.84 टक्क्यांनी वाढून 660 रुपये 90 पैसे प्रति शेअर या पातळीवर गेला होता.





