Sugar Price Drop: साखरेचे गिऱ्हाईक गायब! सलग दुसऱ्या आठवड्यात किलोमागे ‘इतक्या’ रुपयांनी घसरण
Sugar Price Drop: भाववाढीच्या भीतीने नागरिकांनी आधीच केली साखर खरेदी; घरगुती मागणी घटल्याने मार्केट यार्डातील आवक १५० टनांवरून ५० टनांवर.

Sugar Price Drop – मागील आठवड्यात किलोमागे १५ रुपयांनी घसरण झाली होती. तर सणांमुळे गुळाला मागणी आहे. मात्र, कमी झालेले गुळाचे भाव स्थिर असल्याची माहिती गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर साखरेला मागणी वाढली होती. त्यामुळे साखरेच्या भावात मोठी वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उपाययोजना केली.
परदेशातून तयार १० लाख टन साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे साखरेच्या भावात घट झाली आहे. मात्र, आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हा सणासुदीचा काळ आहे. या कालावधीत साखरेच्या भावात मोठी वाढ होण्याच्या शक्यतेने सर्वसामान्य नागरिकांनी साखर खरेदीकरून त्याचा साठा केला. परिणामी, आता घरगुती ग्राहकांकडून साखरेची मागणी घटली आहे.
किराणा दुकानदारांकडून साखरेची बेताने खरेदी करण्यात येत आहे. या कारणाने मार्केट यार्डातील साखरेचा व्यवहार कमी झाला आहे. मार्केट यार्डातील भुसार विभागात दररोज १५० टन होणारी साखरेची आवक आता ५० टनावर आली आहे. घाऊक बाजारात साखरेला किलोला ४७ ते ४८ रुपये भाव मिळत आहे.
आगामी सणासुदीच्या काळात साखरेच्या भावात वाढ होईल, या शक्यतेने सर्वसामान्य नागरिकांनी साखरेची खरेदी करून ठेवली आहे. या कारणाने साखरेची मागणी घटली आहे. त्यामुळे साखरेच्या भावात सलग दुसऱ्या आठवड्यात घट झली आहे. या आठवड्यात मार्केट यार्डातील घाऊक बाजारात किलोमागे ५ रुपयांनी घट झाल्याची माहिती मार्केट यार्डातील साखरेचे व्यापारी मुकेश गोयल यांनी दिली.
“घरगुती ग्राहकांनी करून ठेवलेली साखरेची खरेदी, भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने आखलेल्या धोरणामुळे सलग दुसऱ्या आठवड्यात साखरेच्या भावात घट झाली आहे. येत्या काही दिवसांत भावात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.”
– मुकेश गोयल, साखरेचे व्यापारी, मार्केट यार्ड





