मंचर: हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सण असलेला गुढीपाडवा गुरुवार, दि.१९ रोजी साजरा होत असून, या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण असणारी साखरेची गाठी महागली आहे. साखरेचे बाजार भाव, नैसर्गिक रंग आणि कारागिरांची मजुरी वाढल्यामुळे गाठीच्या बाजारभावात १० टक्के वाढ झाल्यामुळे ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार आहे. मंचर शहरात पारंपरिक गाठी बनवणाऱ्या कारखान्यात लगबग सुरू झाली आहे. येथील श्रीकांत गाठी कारखान्यात सध्या गाठी तयार करण्याचे काम जोरात सुरू असून महाजन कुटुंबाची चौथी पिढी हा पारंपरिक व्यवसाय जपताना दिसत आहे. कारखान्याचे प्रमुख श्रीकांत महाजन यांच्या कुटुंबाकडून अनेक वर्षांपासून गुढीपाडव्याच्या सणासाठी लागणाऱ्या गाठी तयार केल्या जातात. दरवर्षी होळीच्या सणाच्या दिवशी गाठी बनवण्याची सुरुवात करण्याची परंपरा या कुटुंबात आजही कायम आहे. पारंपरिक पद्धतीने लाकडापासून बनवलेल्या साच्यांमध्ये या गाठी तयार केल्या जातात, हीदेखील या कारखान्याची खासियत आहे. मंचर येथे तयार होणाऱ्या गाठींना परिसरात मोठी मागणी आहे. हेही वाचा : विशेषतः पुणे,खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि संगमनेर या भागांतून व्यापारी आणि ग्राहक मोठ्या प्रमाणावर गाठी खरेदी करण्यासाठी येतात. गुढीपाडवा जवळ येत असताना या गाठींची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या कारखान्यामुळे स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाला आहे. गाठी बनवणे, रंगकाम, पॅकिंग अशा विविध कामांमध्ये महिलांचा सहभाग असून त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे. या गाठी साधारण एक ते दीड महिना टिकतात, त्यामुळे ग्राहकांमध्ये त्यांची विशेष पसंती आहे. यावर्षी मात्र साखरेचे दर वाढल्यामुळे गाठींच्या किंमतीत सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच मजुरीही वाढली असून मजूर मिळण्यात अडचणी येत असल्याने व्यवसायास काही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे महाजन कुटुंबीयांनी सांगितले. तरीही ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कारखान्यात १० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या विविध प्रकारच्या गाठी तयार केल्या जात आहेत. येथे तयार होणाऱ्या गाठी अत्यंत दर्जेदार मानल्या जातात. विशेष म्हणजे गाठी तयार करताना नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. त्यामुळे या गाठी आकर्षक दिसण्याबरोबरच आरोग्यासाठीही सुरक्षित आहे. -इंद्रजित पवार,ग्राहक, सुलतानपूर. हेही वाचा :