उद्योगांसाठी साखर 2 रुपयांनी महागली

आईस्क्रिम, सॉफ्ट ड्रिक कंपन्यांना जास्त पैसे मोजावे लागणार
पुणे – साखर कारखान्यांना होणारा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी उद्योगांना विकण्यात येणाऱ्या साखरेच्या दरात किलोमागे दोन रुपयांनी वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. सर्वसामान्य ग्राहकांना विकण्यात येणाऱ्या साखरेच्या दरांमध्ये कुठलाही बदल झालेली नाही.
साखर कारखान्यांच्या आर्थिक तोट्यात दरवर्षी वाढ होत आहे. त्याचा परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या एफआरपीवर पडत आहे. आजच्या घडीलादेखील देशभरातील कारखान्यांकडे सुमारे 22 हजार कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची झाल्यास सर्वप्रथम कारखान्यांना सक्षम करायला हवे. त्यासाठी साखरेच्या दुहेरी किंमतीचा प्रस्ताव मांडला होता. निती आयोगाकडे देखील हा प्रस्ताव गेल्या काही दिवसांपासून मंजुरीसाठी पडून होता. त्यांनी आता मान्यता दिल्यामुळे केंद्राच्या अन्नपदार्थ मंत्रालयानेही मान्य केले आहे.
आईस्क्रिम, सॉफ्ट ड्रिक आणि कॅडबरी कंपन्यांकडून साखरेला मोठी मागणी असते. या कंपन्यांच्या विक्री दरात किलोमागे दोन रुपयांनी वाढ केल्याने कारखान्यांचा तोटा कमी होण्यास मदत होईल. ही दरवाढ दोन रुपयांपेक्षा जास्त नसावी, असे सुद्धा आयोगाने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकांना विकण्यात येणाऱ्या साखरेच्या दरात कुठलीही वाढ करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.





