सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी; नाशिकमधून ‘या’ नेत्याला दिली संधी

Uddhav Thackeray | शिवसेनेतून (उद्धव ठाकरे गट) सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली. सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक, जळगाव, जालना, रत्नागिरी-कोकणमधून चार उपनेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
नाशिकमधून ठाकरे गटाचे मातब्बर नेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दत्ता गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेते पदी दत्ता गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. दत्ता गायकवाड हे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. त्यांच्याकडे नाशिक लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदाचा कार्यभार होता. आता त्यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. Uddhav Thackeray |
चार उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी चार उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. गुलाबराव वाघ (जळगाव), सचिन घायाळ (जालना-पैठण), दत्ता गायकवाड (नाशिक) आणि सुरेंद्रनाथ माने (रत्नागिरी-कोकण) यांना संधी देण्यात आली आहे. गुलाबराव वाघ यांना उपनेते पदाबरोबरच रावेर (लोकसभा मतदारसंघ) आणि नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुखपदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, या संदर्भातील अधिकृत माहिती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. Uddhav Thackeray |
दरम्यान, शिवसेनेचे उपनेते आणि माजी जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्या वेळेपासून ते पक्ष सोडणार अशा स्वरूपाच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली.
…तर मी राजकारण सोडून देईल – बडगुजर
यानंतर बडगुजर यांनी स्पष्ट केलं की, “मी नाशिकबाहेर नियोजित दौऱ्यावर होतो, त्यामुळे पत्रकार परिषदेस उपस्थित राहू शकलो नाही. मी ही माहिती पक्षाला आधीच दिली होती. पण तरीही मला पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पक्षात खरे बोलणं जर गुन्हा असेल, तर मी तो केला आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागरिकांच्या प्रश्नांसाठी भेट घेतली होती. त्यामुळे जर वादळ उठत असेल, तर हे हास्यास्पद आहे. जर मी संघटनेविरोधात काही काम केलं असेल, तर मी राजकारण सोडून देईल,” असं त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितलं.
हेही वाचा :





