Nashik Accident News : लग्नावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; कार थेट बंगल्यात घुसली, ५ जणांचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक अपघात घडला असून, लग्नसमारंभातून परतणाऱ्या नामपूर येथील भदाण कुटुंबाच्या कारला मोठा अपघात झाला आहे. बुधवारी (4 जून) रात्री साडेदहाच्या सुमारास नाशिक-कळवण रस्त्यावर कोल्हापूर फाट्याजवळ भरधाव वेगातील कार थेट रस्त्यालगत असलेल्या बंगल्यावर आदळली. इतका भीषण अपघात होता की कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
शैला वसंत भदाण (62), सरला भालचंद्र भदाण (50), खालिक मेहमूद पठाण (50) – चालक, माधवी मेतकर (32), त्रिवेणी मेतकर (4) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नवे आहेत. हे सर्व जण नामपूर व देवळा परिसरातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये शैला भदाण आणि माधवी मेतकर मायलेकी असून, त्रिवेणी ही माधवी यांची चिमुकली मुलगी होती.
तर भालचंद्र भदाण (52), रा. नामपूर, उत्कर्ष मेतकर (12), रा. देवळा हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून नाशिकच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
अपघातग्रस्त कार (MH 41 BE 5443) नामपूरहून सटाण्याकडे जात होती. नाशिकमध्ये नातेवाईकाच्या लग्नसमारंभात सहभागी झाल्यानंतर कुटुंबीय परतत होते. मात्र, चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यावर आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की बंगल्याबाहेर उभा असलेला मजबूत सिमेंटचा खांबदेखील वाकून गेला.
हा अपघात संपूर्ण भदाण व मेतकर कुटुंबावर काळाची झडप टाकणारा ठरला. लग्नसमारंभानंतर आनंदाने घरी परतणाऱ्या या कुटुंबाच्या सहलीचा शेवट अशा दुर्दैवी पद्धतीने होईल, याची कल्पनाही कोणाला आली नव्हती. घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन चौकशी सुरू केली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्रारंभिक तपासात चालकाच्या डुलकीमुळे किंवा वेगाच्या मर्यादा ओलांडल्यामुळे नियंत्रण सुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.





